मुंबई – लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर आता उर्मिला मातोंडकर या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत उर्मिला मातोंडकर यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून माझी मीडियाला विनंती आहे की त्यांनी माझ्या पक्ष प्रवेशाबाबत कोणतीही अफवा उठवू नये. तसेच मी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नसल्याचं मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोन केल्याची माहिती आहे. त्यानंतर मातोंडकर शिवसेनेत जाणार असल्याची बातमी सगळीकडे पसरली. परंतु उर्मिला मातोंडकर यांच्याशी आपले आणि शिवसेनेचे कौटुंबिक स्नेह आहेत. त्यांच्याशी फोनवरुन झालेल्या संवादाचा राजकीय संबंध जोडू नका, असं आवाहन शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केलं आहे. उर्मिला यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली असली, तरी त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याबाबत काहीच बोललो नसल्याचा दावा नार्वेकरांनी केला आहे.
COMMENTS