काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर ?

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर ?

मुंबई – लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर आता उर्मिला मातोंडकर या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोन केल्याची माहिती आहे. परंतु उर्मिला मातोंडकर यांच्याशी आपले आणि शिवसेनेचे कौटुंबिक स्नेह आहेत. त्यांच्याशी फोनवरुन झालेल्या संवादाचा राजकीय संबंध जोडू नका, असं आवाहन शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केलं आहे. उर्मिला यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली असली, तरी त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याबाबत काहीच बोललो नसल्याचा दावा नार्वेकरांनी केला आहे.

दरम्यान दोन दिवसांवूर्वीच उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.आपले गोपनीय पत्र उघड झाल्याने उर्मिला मातोंडकर यांनी नाराजी व्यक्त केली होती.मी देशसेवेसाठी काँग्रेस पक्षात आले होते, पक्षात येण्यामागे माझा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता असं मातोंडकर यांनी म्हटलं होतं.

मातोंडकर यांनी त्यावेळचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा याचा राजीनामा न स्वीकारण्यबाबत पक्ष नेतृत्वाला पत्र लिहलेले होते. परंतु ते पत्र सार्वजनिक करण्यात आलं होतं, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने नाराज झालेल्या उर्मिला मातोंडकर यांनी राजीनामा दिला. प्रत्येक पक्षात असे मुद्दे असतात आणि ते पक्ष पातळीवर सोडवायला हवेत असं त्यांनी म्हटलं होतं. पक्ष हितासाठी मी खर्गे यांना पत्र लिहले होते, हे पत्र मी निकाल आणि एक्झीट पोल येण्याआधीच लिहिले होते, त्यावरून त्यामागे केवळ पक्षहित असल्याचे लक्षात येईल परंतु हे पत्र सार्वजनिक करण्यात आले. तसेच यावर पक्षानं कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे मी राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

काय आहे प्रकरण?

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले होते. ‘राहुल गांधी यांच्या सन्मानार्थ मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून तो राजीनामा स्वीकारला जाऊ नये. याचे कारण म्हणजे मुंबई काँग्रेसला मिलिंद देवरांसारख्या नेत्याची गरज आहे’, असे मातोंडकर यांनी पत्रात लिहिले होते. मिलिंद देवरा हे मुंबई अध्यक्ष बनल्यानंतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे सर्वजण सकारात्मक दृष्टीने एकजूट होऊन काम करत आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणूक देखील देवरा यांच्याच नेतृत्वात लढल्या गेल्या पाहिजेत. म्हणूनच देवरा यांचा राजीनामा स्वीकारला जाऊ नये, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले होते. प्रदेश प्रभारींना लिहिलेल्या या पत्रात विद्यमान आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि सचिवांच्या सह्या होत्या. परंतु हे पत्र सार्वजनिक करण्यात आले होते. त्यामुळे मातोंडकर नाराज होत्या.

COMMENTS