औरंगाबाद – केंद्र सरकारचे तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने कायद्यांना स्थगिती देत समिती स्थापन केली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत्या २७ जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडी राज्यभर ‘किसानबाग आंदोलन’ करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी आज सांगितले. या आंदोलनास मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला असल्याचे सांगण्यात आले.
आंबेडकर म्हणाले, दिल्लीतील ‘शाहीनबाग’ आंदोलनाला शीख जथ्थ्यांनी पाठिंबा देऊन संरक्षणाची भूमिका जाहीर केली होती. आता मुस्लिम एकत्र येऊन शीख शेतकऱ्यांना पाठिंबा देणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले आहेत. राज्यभरात दिवसभर धरणे आंदोलन होणार आहे. हा काळा कायदा रद्द करावा, शेतमालाला आधारभूत किंमत द्यावी अशा प्रमुख मागण्या आहेत. या आंदोलनामुळे ‘आरएसएस’ आणि भाजपच्या जातीवादी राजकारणाला शह मिळेल, असे आंबेडकर म्हणाले. मौलाना, मुफ्ती यांच्यासह मुस्लिम संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
यावेळी आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘नवीन कृषी कायद्याच्या समर्थक व्यक्तींनाच सर्वोच्च न्यायालयाने समितीत स्थान दिले आहे. तटस्थ तज्ज्ञांची समितीत गरज होती. शेतकऱ्यांच्या पाठिशी कुणी नाही असे सरकारला वाटत आहे. त्यामुळे केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या आंदोलनात काँग्रेससोबतच सीपीआय, सीपीएम हे डावे पक्ष पूर्णत: अपयशी ठरले आहेत. आंदोलनात न उतरण्यासाठी या पक्षांना कोणता लकवा मारला आहे’, असा सवाल आंबेडकर यांनी केला.
COMMENTS