मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता आहे. कारण याबाबत एमआयएम पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना महाराष्ट्रातून पदाधिकाऱ्यांनी पत्र लिहले असल्याचे सांगण्यात येत आहे. या पत्रात स्वतंत्र निवडणूक लढण्याची मागणी त्यांनी
ओवेसी यांच्याकडे केली असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी असा एमआयएमचा प्रस्ताव असून प्रस्ताव देऊनही निर्णय होत नसल्यानं एमआयएमचे नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. एमआयएमने आघाडीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक न लढता आपल्या पतंग चिन्हावरच निवडणूक लढण्याचा आग्रह धरला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत आमची 288 जागा लढण्याची तयारी आहे. मात्र तुम्ही 144 जागांवर लढा, आम्ही 144 जागांवर लढतो असं खुलं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिलं आहे. यापूर्वी आंबेडकरांनी काँग्रेसला 44 जागा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून काँग्रेसला कोंडीत पकडलं जात असल्याचं बोललं जात आहे. यावरुन आंबेडकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे वंचित बहूजन आघाडी लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही स्वतंत्र निवडणूक लढवेल असं दिसत आहे.
COMMENTS