मुंबई:शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी आज ईडी कार्यालयात हजर न राहता मुदत मिळावी, अशी मागणी केली. त्यावर आता येत्या ५ जानेवारी रोजी सक्तवसुली संचालनालयासमोर हजर व्हावे लागणार आहे. ईडी मार्फत वर्षा राऊत यांना आज नव्याने समन्स बजावण्यात आले आहे.
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडी कडून तपास सुरू असून याच प्रकरणात वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यांना २९ डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहायचे होते. मात्र आज त्या ईडीसमोर हजर झाल्या नाहीत. त्यांच्यामार्फत आज एक अर्ज ईडीकडे सादर करण्यात आला होता. त्यात आपणास ५ जानेवारीपर्यंतची मुदत द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. ईडीने ही मुदत दिली असून आता त्यांना ५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.
दरम्यान, आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपला टोला हाणला होता. आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही, ज्यांच्याकडे लपवण्यासारखे असते ते एकतर पळून जातात किंवा भाजपमध्ये जातात, असे राऊत म्हणाले होते. ईडीला काही बाबी तपासायच्या असतील तर त्याला आमचं सहकार्यच राहील, असे नमूद करत आपली पत्नी चौकशीला सामोरी जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
COMMENTS