नागपूर – विदर्भात भाजपला जोरदार धक्का बसला आहे. पक्षाच्या आमदाराने राजीनामा दिला असून लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. गेली काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे ईमेल आणि फॅक्सद्वारे राजीनामा पाठवला आहे. आशिष देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघाचे आमदार आहेत. ते गेली काही दिवसांपासून पक्षनेतृत्वावर नाराज होते. तसेच त्यांनी विदर्भातील शेतक-यांच्या मागण्यांवरुन अनेकवेळा सरकाविरोधात आंदोलनही केलं आहे.
दरम्यान आशिष देशमुख हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात असून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे आज वर्ध्याच्या दौ-यावर आहेत. त्यामुळे आशिष देशमुख हे वर्ध्यात येऊन राहुल गांधींची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं याकडे लक्ष लागलं आहे.
तसेच आशिष देशमुख हे 2014 साली नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत.
विदर्भवादी म्हणून ओळख
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आशिष देशमुख यांनी डिसेंबर 2013 मध्ये बेमुदत उपोषण केले होते, हे उपोषण भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी सोडवले होते. 2014 साली भाजपमध्ये प्रवेश घेऊन काटोल निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत काका व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या त्यांनी पराभव केला होता. मात्र गेल्या 1 वर्ष पासून आमदार आशिष देशमुख पक्षावर नाराज असल्याचं चित्र होते. डिसेंबर 2017 च्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यात भाजप सरकार आल्यावर शेतकरी, बेरोजगारी समस्या वाढल्याची टीका पत्रात त्यांनी केली होती, शिवाय स्वतंत्र विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांना त्यांनी जाब विचारला होता . तेव्हापासून देशमुख सतत पक्ष विरोधी भूमिका घेत राहिले आहेत. मात्र पक्षाने आतापार्यंत त्यांच्या भूमिकेवर गांभीर्याने लक्ष दिले नव्हते.
COMMENTS