मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चुरस पहायला मिळत आहे. शिवसेनेनं आपले उमेदवार जाहीर केले असले तरी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपनं आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे या तिन्ही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस सुरु आहे. राष्ट्रवादीत तर डझनभर नेते उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं दिसत आहे. महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी मंत्री शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, यांच्यासह खजिनदार हेमंत टकले, नाशिक जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजन पाटील यांचेही नावे शर्यतीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान राष्ट्रवादीकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच काँग्रेसकडून माजी मंत्री नसीम खान आणि सचिन सावंत यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. परंतु माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,नागपूरचे माजी महापौर प्रविण दटके,एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS