सही असलेले पत्र पीएने परस्पर दिले, पंकजा मुंडेंच्या त्या ट्वीटमुळे ट्वीस्ट, बंडाच्या रोवलेल्या निशाणीचा ताईंच्या उमेदवारीला धोका?, चर्चांना उधाण !

सही असलेले पत्र पीएने परस्पर दिले, पंकजा मुंडेंच्या त्या ट्वीटमुळे ट्वीस्ट, बंडाच्या रोवलेल्या निशाणीचा ताईंच्या उमेदवारीला धोका?, चर्चांना उधाण !

मुंबई – ते पत्र आपल्या पीए ने परस्पर पाठवले असल्याचं ट्वीट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पक्षाने आणखी कोणाचीही उमेदवारी निश्चित केली नसल्याचेही या ट्वीटमध्ये पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान आज दुपारी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या सहीचे विधान परिषद उमेदवारीसाठी बेबाकी मागणारे एक पत्र व्हायरल झाले, त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी निश्चित झाली असल्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या. काही वेळानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करून त्यात ‘ट्विस्ट’ आणले आहे. हे पत्र आपल्या पीए ने परस्पर दिल्याचे सांगत पक्षाने आणखी कोणाचीही उमेदवारी निश्चित केली नसल्याचे म्हटले आहे.

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी नुकतीच निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आणि भाजपच्या गोटात उमेदवारी कोणाला मिळणार यावरून तर्क वितर्क व अंदाज बांधणीला सुरुवात झाली. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या काही नेत्यांच्या समर्थक – कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची मागणीही होताना दिसून येत आहे. भाजपच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनाही विधानपरिषदेत जाण्याची संधी मिळावी अशी मागणी समर्थकांकडून होताना दिसत आहे.

दुसरीकडे माजी मंत्री पंकजा मुंडे यांना ४ खात्याच्या मंत्री राहूनही स्वतःच्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता, त्याचेही खापर त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी विशेषतः देवेंद्र फडणवीस व अन्य भाजपच्या काही नेत्यांवर फोडलेले लपून राहिले नाही. त्यानंतर दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथ गडावर घेतलेल्या मेळाव्यात त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आणि एकप्रकारे बंडाचे निशाणच रोवले होते.

विधानसभा निवडणूक काळात गृहमंत्री अमित शहा, खा. उदयनराजे भोसले येऊन गेले; इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठवाड्यातील एकमेव सभा पंकजताईंच्या मतदारसंघात झाली, परंतु पंतप्रधान मोदींनी सभा घेतली तिथला उमेदवार पराभूत झाला या यादीमध्ये भर पाडणारी ती सभा ठरली. यामुळे मोदींची मराठवाड्यातील एकमेव सभा वाया घालवणाऱ्या पंकजताईंचे भाजप पक्षश्रेष्ठींसमोर वजन कमी झाले, असाही तर्क काही जाणकार लावतात.

परळी येथील मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर ताईंनी एकनाथ खडसेंना बरोबरीला घेऊन सुनावलेले खडे बोल आणि पक्ष नेत्याविरुद्ध केलेली घोषणाबाजी भाजप पक्षश्रेष्ठी विसरतात न विसरतात तोच ताईंनी पक्षाचा झेंडा बाजूला ठेवत ‘गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान’ची स्थापना केली आणि आपली वेगळी चुलच मांडली!

सहज हाती आलेली सत्ता निसटून गेल्याने भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता असताना ऊसतोड मजुरांच्या परतीच्या कारणावरून ताईंना भाजप नेत्यांच्या जखमेवर मीठ चोळायची संधी मिळाली आणि ताई खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उघड अभिनंदन करून मोकळ्या झाल्या, मात्र अभिनंदनांच्या ट्विट आणि मुलाखतींनी भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या हे नक्की!

दुसरीकडे भाजपमध्ये इतर पक्षातून आलेले हर्षवर्धन पाटील, मोहिते पाटील, उमेदवारी न मिळालेले व फडणवीसांचे समर्थक मानले जाणारे तावडे, बावनकुळे अशी मोठी यादी आहे. त्यात पक्षातील नेत्यांविरुद्ध अनेकदा नाराजी व्यक्त केलेले खडसे – मुंडे यांची डाळ शिजेल का हा महत्वाचा प्रश्न आहे!

भाजपच्या वाट्याला येणाऱ्या अंदाजे तीन जागांमध्ये हाती आलेली सत्ता ज्या शिवसेनेमुळे आणि पवारांमुळे गेली त्यांचे असे उघड आभार मानलेल्या, ‘माझा भाऊ चांगले काम करत आहे’ असे गोडवे गायलेल्या पंकजताईंना भाजप स्थान देईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात एकीकडे मुंडे विरुद्ध मुंडे या लढाईत जिल्हा परिषदेसह भाजपने आपली बरीच बलस्थाने गमावली आहेत, त्यात आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध उघड उघड बंडखोरीचे निशाण रोवलेल्या पंकजाताईंचे पुनर्वसन भाजप नेते करतील की ताईंना आणखी वाट बघावी लागेल हे येणाऱ्या २१ तारखेला स्पष्ट होईलच, तूर्तास देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र भाजपवरील पगडा व त्यांचे राजकीय डावपेच लक्षात घेता पंकजताईंनी विधानपरिषदेत प्रवेश करण्याची समर्थकांची इच्छा पूर्ण होईल की नाही यावरून आता चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आज व्हायरल झालेले ते पत्र व त्यावर सही असताना पंकजा मुंडे यांनीच ‘पीए ने परस्पर पत्र पाठवले, त्याबाबत मला काही माहिती नाही’, असे म्हणणे शंकेला स्थान देणारेच आहे.

COMMENTS