मुंबई – विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी 16 जुलै रोजी होणार्या निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार सहज निवडून येतात. मात्र भाजपाकडून सहा जागा लढवल्या जाण्याची शक्यता आहे. या सहा जागांसाठी विद्यमान आमदार भाई गिरकर, नागपूरचे माजी महापौर प्रविण दटके किंवा संदीप जोशी, दलित चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलींद कांबळे, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, विद्यमान मंत्री महादेव जानकर आणि चंद्रपूरमधील एका महिलेचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ही नावे आघाडीवर असली तरी यामध्ये काही बदल होऊ शकतो. सर्वच पक्ष ही निवडणूक बिनविरोध करण्यासठी प्रयत्न करत आहेत. मतांचा कोटा नसतानाही भाजप सहावा उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजप सहा उमेदवार उभा करणार की ऐनवेळी पाचच उमेदवार उभे करणार ते पहावं लागेल. महादेव जानकर यांना भाजपने कमळाच्या चिन्हावर रिंगणात उतरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र जानकर त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छित आहेत. तर दुसरीकडे ऐनवेळी पाचच जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यास यापैकी एक नाव वगळावे लागणार आहे. तसं झाल्यास शेकापचे भाई जयंत पाटील हे सर्व पक्षांची मिळून 11 वे उमेदवार ठरु शकतील अशीही चर्चा आहे.
COMMENTS