मुंबई – विधान परिषदेच्या आमदारांमधून निवडूण द्यायच्या 11 जागांसाठी या महिन्यात निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार निवडणूक येऊ शकतात. राष्ट्रवादीने एक उमेदवार जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसने दोन उमेदवार जाही केले आहेत. विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर डॉ. वजाहत मिर्झा यांना पहिल्यांदच उमेदवारी देण्यात आली आहे. वजाहत मिर्झा हे यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. दिल्लीतून ही नावे जाहीर करण्यात आली आहेत.
विधान परिषदेच्या दोन जागांसाठी काँग्रेसमध्ये जवळपास 10 ते 12 जण इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी दिल्लीत ठाण मांडलं होतं. तसंच वेगवेगळ्या पद्धतीनं लॉबिंग सुरू केलं होतं. मात्र त्याचा फायदा झाला नाही. मुंबईतील सचिन सावंत यांनाही तिकीट मिळेल असा अंदाज होता. मात्र त्यांनाही यावेळी तरी शांत बसावं लागणार आहे. विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. त्यामुळे आता उपसभापतीपदाची जागा रिकामी होणार आहे. त्या जागेवर आता काँग्रेसकडून कोणाला संधी मिळती ते पहावं लागेल. माणिकराव ठाकरे यांचं नाव यवतमाळ वाशिम या मतदारसंघातून लोकसभेसाठी चर्चिले जात आहे. त्यांना विधान परिषदेचे तिकीट नाकारल्याने पक्षाने त्यांना लोकसभेची तयारी करण्याचा संदेश दिल्याचीही चर्चा आहे.
शिवसेनेकडूनही दोन नावं निश्चित झाली आहेत. मात्र पक्षाकडून त्याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते अनिल परब यांचं एक नाव निश्चित आहे. त्यांच्या नावाची फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. दुस-या जागेसाठी शिवसेनेत जोरदार चुरस सुरू आहे. मनिषा कायंदे याचं नाव आघाडीवर आहे. मात्र त्यांच्या नावाला मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. तुलनेत कायंदे या अलिकडे आल्या आहेत. मात्र राष्ट्रीय पातळीवर पक्षाची प्रवक्ता म्हणून त्यांनी चांगली भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र त्यांच्या निवडीवरुन महिला आघाडीत मोठी नाराजी पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायंदे यांचं नाव कायम राहतं की त्यांच्या जागेवर इतर कोणाला उमेदवारी मिळते ते पहावं लागेल.
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून डावलल्यानंतर आरोग्यमंत्री दीपक सावंत हेही विधान परिषदेच्या या जागेसाठी आग्रही होते. मात्र त्यांना इथे पुन्हा संधी देण्यात आली नाही. त्यामुळे सावंत पक्षावर प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईत विधान परिषदेतील आमदारांची सत्कार कार्यक्रम झाला. त्याला पक्षाचे नेते झाडून उपस्थित असताना डॉ. दीपक सावंत यांनी मात्र या कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. त्यामुळे डॉ. सावंत मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मग त्यांनी राजीनामा दिल्यास आरोग्यमंत्री कोण होणार ते पहावं लागेल.
COMMENTS