मुंबई – विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. भाजप शिवसेना युतीचे प्रसाद लाड आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे उमेदवार दिलीप माने यांच्यात लढत होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी रात्री युतीच्या आमदारांची बैठक घेतली. तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर आघाडीच्या आमदारांना नेत्यांनी मार्गदर्शन केलं.
शिवसेना आणि भाजप यांच्याकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे प्रसाद लाड यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र नारायण राणेंना उमेदवारी नको या बदल्यात शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिला आहे. दोन्ही पक्षातले संबध खूप ताणले गेले आहेत. त्यापार्श्वभूमीवर अदृश्य बाण दिलीप माने यांच्या मदतीला येतील असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं होतं. तर राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणे अदृश्य हात प्रसाद लाड यांना मदत करतील आणि ते 200 पेक्षा जास्त मते मिळवतील असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यामुळे आता कोण कोणाच्या मदतीला येईल आणि किती मते घेईल हे आता काही तासातच समजणार आहे.
COMMENTS