मुंबई – नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी एनडीएकडून कोणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता लागलेली आहे. नारायण राणे हे जर उमेदवार असतील तर शिवसेना विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप राणेंच्या विषयी रिस्क घेण्यास तयार नाही अशी चर्चा आहे. राणेंसाठी सरकारची स्थिरता पणाला लावण्याचा भाजपची तयारी नाही. त्यातच गुजरात निवडणूक तोंडावर असल्यामुळे जर रिस्क घेतली आणि राणेंचा पराभव झाला तर अत्यंत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच इतर पर्यांयाचा शोध सुरू झाल्याची कुजबूज पक्षात आहे.
नारायण राणे उमेदवार नसले तर शिवसेना भाजपसोबत जाऊ शकते. त्यातच शिवसेनेला विश्वासात घेऊन त्यांच्या पसंतीचा उमेदवार दिल्यास भाजपचा उमेदवार सहज जिंकूण येणार आहे. त्यामुळे शिवसेनेला चुचकारण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. सध्या भाजपकडून पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आणि पक्षाच्या नेत्या शायना एनसी यांची नावे चर्चेत आहेत.
या दोन नावापैंकी माधव भांडारी यांच्या नावाला शिवसेनेकडून विरोध होऊ शकतो. भांडारी यांनी अनेकवेळा शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनेवर थेट हल्लाबोल केला आहे. त्यामुळे भांडारींच्या नावाला शिवसेना विरोध करु शकते. खरंतर सत्तेवर आल्यापासून अनेकवेळा भांडारींचं नाव विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी चर्चेत आलं. मात्र प्रत्येकवेळी या ना त्या कारणाने त्यांचं नाव मागे पडलं. त्यामुळे भाजपकडून त्यांच्याच नावाला पसंती दिली जाईल अशी चर्चा आहे. मात्र शिवेसनेच्या भूमिकेवरच उमेदवार ठरवावा लागणार असल्याने त्यांचे नाव मागे पडण्याची शक्यता आहे.
भांडारींना शिवसेनेकडून विरोध झाला तर भाजप नेत्या शायना एनसी याचं नाव पुढं केलं जाण्याची शक्यता आहे. टीव्हीवर पक्षाची बाजू मांडण्याचं काम त्या सध्या करत आहेत. इंग्रजी हिंदी आणि मराठी चॅनलवर त्या पक्षाची भूमिका मांडत आहेत. तसंच मातोश्रीवरही त्यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे शिवेनेकडून त्यांच्या नावाला पाठिंबा मिळू शकतो अशी चर्चा आहे. भाजपकडून उमेदवार निश्चित झाल्यानंतरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्ट्रॅटर्जी ठरण्याची शक्यता आहे. येत्या 7 डिसेंबलला विधान परिषदेच्या एका जागेसाठी मतदान होणार आहे.
COMMENTS