मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या सहा जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. गतवेळच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात मोठय़ा प्रमाणावर वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे सर्व पक्ष आणि उमेदवारांची धाकधुक वाढली आहे, औरंगाबाद आणि पुणे पदवीधर या मतदारसंघांच्या निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. पुणे शिक्षक मतदारसंघात गतवेळच्या तुलनेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये तर जवळपास ८३ टक्के मतदान झाले. सर्व मतदारसंघाची मतमोजणी आज होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारला एक वर्षपूर्ण झाल्यानंतर व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. यासाठी शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. तर भाजपने एकट्याने महाविकास आघाडीशी लढत दिली. त्याचबरोबर मनसे, वंचित आघाडी, प्रहार यांच्यासह बंडखोर उमेदवारांनीही निवडणुकीच चांगली रंगत आणली.
पुणे, नागपूर, आणि औरंगाबाद पदवीधर तसेच पुणे व अमरावती शिक्षक अशा पाच मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान झाले. याशिवाय धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूकही पार पडली. सर्व सहाही मतदारसंघांतील मतमोजणी गुरुवारी होणार आहे. मतमोजणी ही पसंतीक्रमानुसार केली जात असल्याने निकाल जाहीर होण्यास दुसरा दिवस उजाडेल, अशीच चिन्हे आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ६२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात कोणत्याही उमेदवाराने पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण न केल्यास निश्चित मतांचा कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागेल. यात सर्वात कमी मते मिळणारे उमेदवार उतरत्या क्रमाने एकापाठोपाठ बाद होतील. ही सारीच किचकट प्रक्रिया आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Older Post
महाराष्ट्र सरकारने घेतला हा पुरोगामी निर्णय
COMMENTS