देशातील प्रमुख राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आल्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला असं म्हणता येईल. जोडीला ३७० तोफांची सलामीही झाली. पंकजा मुंडे यांनी त्याबाबतीत आघाडी घेतली असून ओबीसी नेता म्हणून आपली प्रतिमा राष्ट्रीय अध्यक्षांसमोर उभी करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. परंतु त्यांना त्याचा फायदा होणार की तोटा याचे उत्तर काळच देईल. कारण भाजपच्या नेतृत्वाला अशी ताकद असलेली माणसं नको असतात. ताकद असलेली माणसं मोठी केली की ती कधीही आव्हान देऊ शकतात, अशी भाजपच्या विद्यमान नेतृत्वाची धारणा आहे. त्यामुळं ज्यांच्यामागं ताकद नाही, अशा फडणवीस, खट्टर यांना नेतृत्व म्हणून पुढं केलं जातं.
अमित शहा यांनी मंगळवारी सावरगावमध्ये पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात ३७० कलमाचाच प्रचार केला. ३७० वे कलम लागू करून दोन महिने उलटून गेल्यानंतरही भाजपने हा मुद्दा सोडलेला नाही. विधानसभा निवडणूक महाराष्ट्राची आहे, परंतु भाजपचा एकही नेता महाराष्ट्रातील प्रश्नांसंदर्भात, फडणवीस सरकारने केलेल्या कामांसंदर्भात काही बोलायला तयार नाही. कोल्हापूरहून कोथरूडमध्ये शिफ्ट झालेले चंद्रकांत पाटीलही कोथरूडबद्दल बोलायला तयार नाहीत. त्यांनीही तिथे३७० कलमाच्या चर्चेलाच प्राधान्य दिले आहे. अति झाले आणि हसू आले, असे आपल्याकडे म्हटले जाते. तेच ३७० कलमाबाबत होऊ लागले आहे. महाराष्ट्रातले प्रश्न सोडून ३७० कलमाचा अतिरेक केल्यामुळे भाजपवर आता ते बूमरँग होऊ लागल्याचे दिसत आहे. कोथरूडमधील ३७० कलमाची चर्चा असो किंवा अमित शहा यांचे सावरगावमधले भाषण असो, सोशल मीडियावर त्यासंदर्भात ज्या तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत, त्याची खिल्ली उडवली जाऊ लागली आहे, त्यावरून ३७० कलमाच्या राजकीय मुद्द्याची हवा निघून गेली असल्याचे स्पष्ट होते. काही वृत्तवाहिन्यांनीही राष्ट्रीय प्रश्न नको मुद्द्याचे बोला, आमच्या प्रश्नांचे बोला म्हणून मोहीम चालवली आहे. त्यातूनही लोकांच्या तीव्र भावना दिसून येतात.
पंतप्रधान मोदींना पूर्ण बहुमत दिल्यानंतर पाच महिन्यांमध्ये कलम ३७० रद्द केले, असे सांगून सावरगावच्या मेळाव्यात अमित शहा यांनी, ‘काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे तुम्हाला मान्य आहे की नाही? कलम ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार का?’ असा सवाल उपस्थितांना केला. पंकजा मुंडे यांनीही ३७० कलमावरच जोर दिला. अमित शहा यांच्या भाषणातले एक विडंबन मात्र अस्वस्थ करून गेले. उपस्थितांपैकी बहुतांश लोकांना उद्या पोटासाठी कोयता घेऊन स्थलांतर करावे लागणार आहे, पाठीवर बिऱ्हाड घेऊन भटकंतीसाठी निघावं लागणार आहे त्या लोकांना अमित शहा, ‘उद्यापासून तुम्ही प्रत्येकानं घराघरात जाऊन ३७० कलमाचा प्रचार करा’ असं सांगत होते. जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष लोकांच्या प्रश्नांपासून किती लांब आहे, हे यावरून दिसत होतंच, परंतु कष्टकरी माणसांची एवढी क्रूर चेष्टा समोरासमोर कधी कुणी केल्याचं पाहिलं नव्हतं.
निवडणूक महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांवर काही बोलत नाहीत. ज्या मराठवाड्यात सभा घेतात त्या मराठवाड्याच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. जानेवारी २०१९ ते जुलै २०१९ या सात महिन्यांत मराठवाड्यात ५१९ शेतकरी आत्महत्यांची सरकारी नोंद आहे. त्यातही सर्वाधिक १२४ आत्महत्या बीड जिल्ह्यात आहेत. तिथल्या मेळाव्यात त्याबाबत चकार शब्द काढला जात नाही. याला अहंकाराशिवाय दुसरी उपमा देता येत नाही.
परळीचे औष्णिक विद्युत केंद्र बंद पडण्याच्या स्थितीत आहे. तिथला आठवा संच मार्गी लागला नाहीच, परंतु आहे तेच संच चालवणं मुश्किल झालं आहे. तिथल्या वसाहतीवर अवलंबून असलेल्या स्थानिक पातळीवरील किराणा दुकानदार, दूधवाल्यापासून अनेकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योगवाढीच्या नावानं बोंब आहे. यवतमाळनंतर बीडची कापूस लागवडीत आघाडी आहे, त्यादृष्टीनंही काही झालं नाही. आधीच्या राज्यकर्त्यांनी केलं नाही, परंतु सध्याच्या राज्यकर्त्यांनीही केलं नाही. दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला आहे. पाटातलं पाणी सेल्फीपुरतंच पुरत असल्याचं वास्तव आहे. बाकी स्थलांतराशिवाय जगण्याचा मार्ग नाही. येत्या पाच वर्षांत बांधवांच्या हातातला कोयता काढून टाकण्याचं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलं, परंतु गेल्या पाच वर्षांत काय केलं? ऊसतोड महामंडळ अवघ्या काही आठवड्यांपूर्वी अस्तित्वात आलं. यंदाही पावसाची स्थिती काळजा वाढवणारी आहे. बीड शहराच्या माजलगाव धरणातून पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे. सोयाबीन गेल्यातच जमा आहे. मक्यावरही अळीनं आक्रमण केल्यामुळं हाती लागण्याची शक्यता कमी आहे. याबद्दल मेळाव्यात चकार शब्द काढला जात नाही.
धौम्य ऋषींचे वास्तव्य असलेल्या गडाला धौम्यगड म्हणून ओळखले जात होते. धौम्यगडाचे ऐतिहासिक महत्त्व जाणून संत शिरोमणी भगवानबाबा इथे वास्तव्यास आले आणि त्यांनी अथक प्रयास करून गडाची उभारणी केली. गडाचे उदघाटन एक मे १९५८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी यशवंतराव म्हणाले, ‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’
तेव्हापासून गड भगवानगड म्हणून ओळखला जाऊ लागला. भगवानगडावर मुख्य उत्सव विजयादशमीला होतो. खेड्यापाड्यातील भाविकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदु:खाची देवाणघेवाण करावी हा उद्देश होता. पुढं विजयादशमीनंतर रोजगारासाठी सीमोल्लंघन करण्याचा धागा जोडला गेला, जो आजही कायम आहे. धार्मिक उद्देश मागं पडून राजकीय उद्देश जोडला गेला. एरव्ही उद्याला हे लोक पोटासाठी बाहेर पडले असते, परंतु यावेळी निवडणुकांमुळं हे जाणं थोडं पुढं ढकललंय. ज्यांच्यापुढं उद्याच्या जगण्याची भ्रांत आहे, त्यांना अमित शहा सांगताहेत, घरोघरी जाऊन ३७० कलम सांगा…
अमित शहा भाषणामध्ये गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे यांची नावं घेत होते तेव्हा समोरून प्रचंड प्रतिसाद मिळत होता. परंतु ३७० कलमासंदर्भातील मुद्द्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मेळावा संपल्यानंतर सोशल मीडियावर त्याविरुद्ध ज्या त्वेषानं लोक तुटून पडले ते पाहिलं तर लक्षात येतं की ३७० चं अति झाल्यामुळं भाजपवर त्याचं बूमरँग होऊ लागलंय. कोथरूडकरांना भले ३७० कलमावरची चर्चा आवडणारी असेल, परंतु बाकीच्या महाराष्ट्राला भावनिक मुद्द्यांचा उबग आलाय. आमच्या रोजच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांवर तुम्ही काय करणार आहात, याचं उत्तर त्यांना हवंय. शेकडो उद्योग बंद पडले, हजारो रोजगार गेले त्यासंदर्भात काय करणार आहात त्याचं उत्तर हवंय. ७२ हजार पदांच्या नोकरभरतीचं काय झालं त्याचं उत्तर हवंय…
– विजय चोरमारे
COMMENTS