गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी, दुस-यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ !

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी, दुस-यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ !

गुजरात – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहूमत मिळाल्यानंतर भाजपची सत्ता स्थापन करण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. गुजरातच्या  मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत होते परंतु भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा विजय रुपाणी यांचीच मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. विजय रुपाणी यांच्या नावाची घोषणा शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली आहे. तसेच नितीन पटेल यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. भाजपाच्या नव्याने  निवडून आलेल्या सर्व आमदारांची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत रुपानी यांची एकमताने मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली.

गुजरातच्या  निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप १५० जागा जिंकणार असल्याचा विश्वास दर्शवला होता. परंतु भाजपला शंभरीही गाठता आली नसल्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणींना संधी दिली जाणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.परंतु या चर्चेला अखेर पूर्णविराम देत भाजपनं विजय रुपाणी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

तसेच या निवडणुकीदरम्यान विजय रुपाणी यांचा गुजरातमध्ये प्रभाव नसून पंतप्रधान नरेंद्र मोदीच भाजपाचा मुख्य चेहरा असल्याचेही दिसून आले. प्रत्यक्षातही भाजपाला जेमतेम सत्ता राखण्याएवढ्या म्हणजे बहुमतापेक्षा अवघ्या सात जास्त जागा मिळाल्या. त्याचवेळी रुपाणींच्या नावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु विजय रुपाणी यांना  भाजपानं आणखी एक संधी दिली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात चांगली कामगिरी करून पक्षाचं कमी झालेल्या मताधिक्य वाढवण्याचं आव्हान विजय रुपाणी यांच्यापुढे आहे. त्यामुळे हे आव्हान रुपाणी कशाप्रकारे पेलवतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

COMMENTS