नागपूर – हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता. या दिवशीही विरोधकांनी विविध मुद्द्यांवर सरकारवर जोरदार टीकास्त्र केलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तर सभागृहात जवळपास शंभर प्रमाणपत्रांचं वाटप केलं आहे. मुख्यमंत्री, मंत्री आणि इतर आमदारांना विखे-पाटलांनी मी लाभार्थीचे प्रमाणपत्र वाटप करत आहे. या सरकारचे खरे लाभार्थी मुख्यमंत्री आणि मंत्री असल्यामुळेच हे त्यांना प्रमाणपत्र प्रदान करत असल्याचं त्यावेळी विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या प्रमाणपत्रामध्ये मुख्यमंत्री आपणास प्रमाणीत करण्यात येते की, सत्तेत आल्यापासून आपलीच समृद्धी झाली आहे. राज्यातील दहा हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच राज्यात भ्रष्टाचाराचा विक्रम होत आहे आणि त्यांना क्लिनचीट देण्याचा सपाटा मुख्यमंत्र्यांनी सुरु ठेवला आहे. राज्यात नुसत्या घोषणा केल्या जात आहेत त्याबाबत आपणास हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. असा मजकूर या प्रमाणपत्रात छापण्यात आला आहे. राज्यातील वाढती गुन्हेगारी, शेतक-यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवर विखे-पाटील यांनी सभागृहात जोरदार बॅटींग करत सरकारचे वाभाडेच काढले असल्याचं पहावयास मिळालं आहे.
COMMENTS