भाजप आणि उद्धव ठाकरेच राज्य सरकारचे लाभार्थी –विखे-पाटील

भाजप आणि उद्धव ठाकरेच राज्य सरकारचे लाभार्थी –विखे-पाटील

नागपूर – सोमवारपासून राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु होते आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे विरोधकांनी चहापानावर  बहिष्कार घातला आणि सरकारविरोधी भूमिका मांडत पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. ओखी वादळापेक्षा हे सरकार घातक असून या वादळामुळे जेवढे नुकसान झाले नाही तेवढे नुकसान युती सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात झाले असल्याची टीकी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.

सरकारमधून बाहेर पडण्याच्या इशाऱ्यांचे शतक पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतो असा टोलाही या प्रसंगी राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. तसेच या सरकारचे दोन लाभार्थी आहेत एक म्हणजे भाजप आणि दुसरे उद्धव ठाकरे अशी खरमरीत टीकाही विखे-पाटील यांनी केली.

त्यावेळी बोलताना शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीका केली. ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याने आत्महत्या केली याचे कारण सरकारमधील मंत्र्यांना भेटूनही त्यांच्यावर त्याचा विश्वास बसला नाही असा आरोप त्यांनी केला. तीन वर्षांच्या कारकिर्दीत १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचंही ते म्हणाले. तसेच ज्या ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा दावा राज्य सरकारने केला त्यांची नावे राज्य सरकारच्या वेबसाईटवर तातडीने प्रसिद्ध करावीत म्हणजे खरे काय ते समोर येईल असं आव्हानही त्यांनी केलं.

एकूणच उद्यापासून सुरु होणा-या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे या अधिवेशनात नेमके कोणते मुद्दे गाजणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS