राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला, राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका !

राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला, राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका !

साक्री – पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये केंद्र व राज्य सरकारने केलेली कपात म्हणजे’राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत धुळे जिल्ह्यातील साक्री येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सरकारवर चौफेर टीका करताना ते म्हणाले की, या सरकारने मागील ४ वर्षात केलेल्या भाववाढीच्या तुलनेत दोन दिवसांपूर्वी केलेली कपात अतिशय कमी आहे. स्वयंपाकाच्या गॅसमध्येही सरकारने जनतेची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना ते म्हणाले की, सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येत नाही. धुळ्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांवर ऑक्टोबरमध्येच दुष्काळ घोंगावतो आहे. पण सरकार अजून दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. दोन वर्षांपूर्वी विदर्भातल्या ११ हजार गावात दुष्काळ असतानाही या सरकारने त्याची घोषणा केली नाही. शेवटी काँग्रेसचे कार्यकर्ते नागपूर खंडपिठात गेले. न्यायालयाने सरकारने कानउघाडणी करून दुष्काळ जाहीर करण्याचे आदेश दिले. यंदा तरी सरकार स्वतःहून दुष्काळ जाहीर करणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करून विखे पाटील यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी त्यांनी केली.

या सरकारने कर्जमाफी घोषणा केली. पण त्याची योग्य अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे कर्जमाफी योजना फसवी ठरली. हे सरकार वेळीच मदत करत नसल्याने आजवर १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांना न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी थेट मंत्रालयात जाऊन विष प्राशन केले. शेतकऱ्यांना बोंडअळीचे पैसे मिळाले नाही म्हणून नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात आम्ही रात्री दीड वाजेपर्यंत विधानसभेत ठिय्या मांडून बसलो. मुख्यमंत्र्यांनी रात्री १.३० वाजता फोन करून सांगितले की, आम्ही तातडीने बोंडअळीची मदत वितरीत करतो. पण हे आश्वासन सुद्धा पोकळ निघाले. या सरकारने वारंवार जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आता लोकांनी हे सरकार खाली खेचण्याचा निर्धार केल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.

COMMENTS