मुंबई – भाजपचे नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन विनोद तावडे यांनी त्यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली असल्याची माहिती आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात सध्या तर्कवितर्क लढविले जात आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. तसेच या भेटीदरम्यान विनोद तावडे यांनी ठाण्यामध्ये होणा-या नाट्यसंमेलनाचं निमंत्रण राज यांना दिलं आहे.
दरम्यान मुंबई आणि कोकणातील शिक्षक-पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांच्या इतर पक्षातील नेत्यांसोबत भेटीगाठी सुरु असल्याचं दिसत आहे. कारण कालच गिरीश महाजन यांनी छगन भुजबळांची भेट घेतली होती. त्यानंतर आज तावडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपकडून वेगळी रणनिती आखली जात असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS