अहमदनगर – सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११८ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून नगरच्या प्रवरा उद्योग समुहामार्फत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कार वितरण आणि शेतकरी दिनाच्या समारंभात विविध मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी वरिष्ठ पत्रकार, ज्येष्ठ किर्तनकार आणि संवेदनशील कवी ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना समाजप्रबोधन पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.
दरम्यान देशात आणि राज्यात धार्मिक उन्माद वाढत आहे. समतेची शिकवण देणा-या पंढरीच्या वारीतही या प्रवृत्ती तलवारी घेऊन घुसून पाहात आहेत. संत वचनाचे दाखले देत त्याचा प्रतिवाद करण्याचे काम ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर करीत आहेत. त्यांचे हे धाडस खरोखर कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांनी काढले.
महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची पेरणी वारकरी संतांनी केली. जात-धर्माच्या पलिकडे जाऊन त्यांनी माणूसपण भक्कम करण्याचा प्रयत्न केला. तोच संतांचा विचार शामसुंदर महाराज सोन्नर समर्थपणे पुढे नेत आहेत, असे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले.
शेती प्रधान युगाकडुन सुरू झालेली आपल्या भारत देशाची वाटचाल आता ज्ञान प्रधान युगाकडे जात असून यामध्ये उपलब्ध होणा-या संधी या खूप मोठ्या आहेत. नवीन ग्राम रचनेसाठी या ज्ञान प्रधान युगाचा सेतु निर्माण करण्यासाठी प्रवरा परिसराने आणखी एक पाऊल पुढे टाकावे, अशी अपेक्षा भारतीय अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभुषण डॉ. अनिल काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केली.
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११८ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कार वितरण आणि शेतकरी दिनाच्या समारंभात डॉ. अनिल काकोडकर बोलत होते. आपल्या भाषणात डॉ. अनिल काकोडकर म्हणाले की, असलेल्या व्यवस्थेला तंत्रज्ञानाची जोड दिली गेली तर ग्रामीण भागातच प्रक्रिया करणा-या उद्योगांची साखळी निर्माण होऊ शकेल. या निमित्ताने निर्माण होत असलेल्या नव्या ज्ञानप्रधान युगात इतर संधींबरोबरच विकेंद्रीकरणाचीही संधी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या शानदार सोहळ्यास ९१ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ. भाऊसाहेब कांबळे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे आदि याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते यावर्षीचे साहित्य पुरस्कार वितरीत करण्यात आले.
COMMENTS