युपीए अध्यक्षपदावरून शिवसेना- काॅंग्रेसमध्ये जुंपली

युपीए अध्यक्षपदावरून शिवसेना- काॅंग्रेसमध्ये जुंपली

मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन एक वर्षे पूर्ण होऊनही सरकारमधील घटक पक्षांमधील कुरबुरी संपता संपत नाहीत. दररोज वेगवेगळ्या प्रकरणात एकमेकांवर हल्ला चढविण्यासाठी पक्षाचे नेते तयारीतच असतात. मागील काही दिवसांपूर्वी युपीए अध्यक्षपदाची चर्चा आहे. यावर शिवसेनेने शरद पवार यांना हे पद द्यावे, अशी मागणी केल्यानंतर काॅंग्रेस नेत्यांनी युपीएबाबत चर्चा करू नये, असा इशारा त्यावर आज शिवसेनेने त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवून “पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे यूपीए अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे, पण ते व्हायचे कसे? विरोधकांच्या ऐक्यावर सध्या राष्ट्रीय मंथन सुरू झाले आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा वादाचा मुद्दा नाही. यूपीए भक्कम करावी व भाजपासमोर आव्हान उभे करावे, हा मुद्दा आहे. काँग्रेस पक्ष हे सर्व घडवून आणण्यास समर्थ असेल तर त्यांचे स्वागत आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

सामनाच्या आग्रहलेखात शिवसेनेने म्हटले आहे की, “आज काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांनीही स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांचे निकाल भाजपा विरोधकांचे डोळे उघडणारे आहेत. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे व आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो, असेदेखील त्यांचे नेते म्हणतात. आमचेही त्याबाबत वेगळे मत नाही. मोठ्या पक्षाच्या वाटचालीस आमच्या शुभेच्छा!,” असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

“काँग्रेस आजमितीस नक्कीच मोठा पक्ष आहे. पण मोठा म्हणजे नक्की काय आकारमानाचा? काँग्रेसच्या खालोखाल तृणमूल, अण्णा द्रमुक असे पक्ष संसदेत आहेत व हे सर्व भाजप विरोधक आहेत. देशातील विरोधी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे व विखुरलेला विरोधी पक्ष एका झेंडय़ाखाली एकत्र यावा, अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा? देशात भाजपाविरोधात असंतोषाच्या ठिणग्या उडत आहेत. लोकांना बदल हवाच आहे. त्याप्रमाणे पर्यायी नेतृत्वाची गरज आहे. ते कोण देऊ शकेल हा प्रश्न आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

COMMENTS