उस्मानाबाद – मांजरा प्रकल्पातून लातूर येथील औद्योगिक वसाहतीला होणा-या पाणी पुरवठ्याला केजच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी विरोध केला होता. आता कळंब नगर परिषदेने सुद्धा औद्योगिक वसाहतीचे पाणी बंद करण्यात यावं याचा ठराव घेतल्यामुळे आता औद्योगिक (एमआयडी ) वसाहतीच्या पाण्यावरुन चांगलाच वाद पेटला असुन या माध्यमातून पाणी वॉर सुरु झाल्याचे दिसून येत आहे. मांजरा धरणातून कळंब आणि केजला पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.
मांजरा धरणाची एकूण साठवण क्षमता २२४ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्तपाणी साठा क्षमता १७६.९६३दशलक्ष घनमीटर आहे. मांजरा धरणातून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरासह तालुक्यातील २० गावांना तर लातूर शहर, लातूर एमआयडीसी, आंबाजोगाई शहर, केज, धारूर या शहरांना पिण्यासाठी पाणी पूरवठा करण्यात येतो. सलग २ वर्षे मांजरा धरण पुर्ण भरल्यामुळे शेतकऱ्याना दिलासा मिळाला होता. या वर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे धरणातील पाणी साठा कमी होवून सध्या मृतसाठ्याच्याही आत पाणी साठा आला असुन सध्या ४३ दलघमी एवढा मृत पाणी साठा आहे.
काही दिवसापूर्वी केजच्या आमदार संगिता ठोंबरे यांनी एका रात्रीतून जलसंपदा मंत्र्यांच्या माध्यमातून लातूर औद्योगिक वसाहतीला होणारा पाणीपुरवठा बंद केला होता. त्यानंतर लातूर येथील पालकमंत्री संभाजी पाटील यांनी दिनांक १३ ऑक्टोबर रोजी पाणी सुरळीत केला होता. मात्र केज, अंबाजोगाई परिसरातील शेतीचे पाणी बंद करून लातूर येथील औद्योगिक वसाहत येथे पाणी पुरवठा सुरु केला होता. त्यामुळे पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. आता लातूर येथील औद्योगिक वसाहत येथील पाणी पुरवठा बंद करण्यात यावा असा ठराव कळंब नगर परिषदेने घेतला आहे. त्यामुळे आता एमआयडीच्या पाण्यावरुन चांगलाच वाद पेटला असुन या माध्यमातून पाणी वॉर सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
COMMENTS