मुंबई – मुंबई काॅंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सध्या चुरस सुरू आहे. आगामी काळात या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत अनेक अंदाज व्यक्त होत असून यामध्ये आजी-माजी नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यांनी दिल्लीत लाॅंबिग सुरू केले आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबई काॅंग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांची निवड झाली. मात्र, त्यांच्या नेतृत्वावर विविध स्तरावर प्रश्न उपस्थित केला जावू लागला. आगामी काळात मुंबई महानगर पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर पुन्हा अध्यक्षपदासाठी चुसर वाढली आहे. सध्या भाई जगताप, सुरेश शेट्टी, चरणसिंग सतरा या तिघांची ची नावे आघाडीवर आहेत.
मुंबईत काॅंग्रेसचे मतदार म्हणून उत्तरभारतीय, दलित आणि मुस्लिम यांच्याकडे पाहिले जाते. अनेक वर्षांपासून हे तीन घटक काॅंग्रेसला साथ देत होते. पण मोदी लाटेत उत्तरभारतीय मतदार भाजपकडे वळाला. मराठी मतदार तर काॅेंग्रेसपासून दोन हात लांबच राहिला आहे. मुस्लिम मतदार एमआयएमकडे आशेने पाहात आहे. दलित मतदार सक्षम नेतृत्वाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे आगामी मुंबईच्या अध्यक्षावर मोठी जबाबदारी असून मराठी, उत्तर भारतीय, दलित आणि मुस्लिम या मतदारांना आपल्या सोबत घेऊन मुंबईत पक्षाला गतवैभव मिळण्याचे पक्ष नेतृत्वासमोर आव्हान आहे.
अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आगामी दोन आठवड्यात निवड केली जाईल. यासंबंधी पक्ष नेतृत्व लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांनी यांनी दिली.
COMMENTS