पार्थच काय कोणीही पवार माझ्याविरोधात लढले तरी मला फरक पडणार नाही – श्रीरंग बारणे

पार्थच काय कोणीही पवार माझ्याविरोधात लढले तरी मला फरक पडणार नाही – श्रीरंग बारणे

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघात माझा जनसंपर्क चांगला आहे. मला ओळख निर्माण करण्यासाठी बॅनरबाजी करण्याची आवश्यकता नाही, कोण पार्थ पवार?, पार्थच काय, कोणीही पवार माझ्या विरोधात लढण्यास आले, तरी मला फरक पडणार नसल्याचं वक्तव्य शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी केलं आहे.

दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघ आघाडीमध्ये ‘राष्ट्रवादी’च्या वाट्याला आला आहे. आगामी निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे मावळ लोकसभेची जागा लढवणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांना विचारलं असता आगामी निवडणुकीत कोणीही पवार विरोधात असले तरी आपण जिंकणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार स्वत: पार्थसोबत मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांनी मावळ मतदारसंघात होर्डिंग, फ्लेक्स व बॅनरबाजी करण्यात आली. त्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासोबत पार्थ पवार यांचा फोटो झळकले. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पत्रकार परिषदेत बारणे यांना विचारले असता सध्या पार्थची ओळख अजित पवार यांचा पुत्र हीच आहे. त्याची ओळख निर्माण होण्यासाठी फ्लेक्स व बॅनरबाजी सुरू आहे.

माझे मतदारसंघात काम असल्याने मला अशी बॅनरबाजी करण्याची आवश्यकता नाही. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला आहे. त्यानुसार माझी तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मी भाजपाकडून लढणार असल्याच्या वावड्या विरोधकांनी उठविल्या होत्या. परंतु, मावळ लोकसभा मतदारसंघातून मी शिवसेनेचाच उमेदवार असणार असल्याचं श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केलं आहे.

 

COMMENTS