येडियुरप्पा राज्यपालांच्या भेटीला, सत्ता स्थापनेचा दावा ?

येडियुरप्पा राज्यपालांच्या भेटीला, सत्ता स्थापनेचा दावा ?

बंगळुरू  कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. त्यामुळे आता काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी चुरस निर्माण झाली असल्याचं दिसत आहे.  सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला आहे तर,  भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा हे राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून येडियुरप्पा राज्यपालांपुढे सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला असला तरी त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यानं सत्तेची समीकरणं बदलली आहेत.

दरम्यान भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच जेडीएसला मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्तावही देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसच्या प्रस्तावानुसार, जेडीएसला मुख्यमंत्रीपद आणि ११ मंत्रीपद तर, काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद आणि २१ मंत्रीपद मिळायला हवेत. जर काँग्रेसने दिलेला प्रस्ताव जेडीएसने स्वीकारला तर कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसची सत्ता स्थापन होणार आहे. काँग्रेसने दिलेला प्रस्ताव जेडीएसने स्वीकारला आहे. तसेच भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणार असल्याचं जेडीएसच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. त्यामुळे आता भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी कोणती खेळी खेळणार याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS