उत्तर प्रदेश – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील एक राजकीय अंधश्रद्धा शनिवारी मोडून काढली आहे. गेली तीस वर्षांपासून उत्तरप्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी या अंधश्रद्धेचा धसका घेतला होता. आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील नोयडा या शहराला भेट दिली आहे. या शहराला जो मुख्यमंत्री भेट देतो तो परत निवडून येत नाही असा धसका राज्यातील आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. त्यामुळे गेली तीस वर्षापासून या शहराकडे एकही मुख्यमंत्री फिरकला नव्हता. याबाबत योगी आदित्यनाथ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
दरम्यान सोमवारी नोएडामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली मेट्रोच्या मजेंटा मार्गावरील कलकाजी मंदिर-बोटॅनिकल गार्डन उद्घाटन केलं. या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते नोयडामध्ये आले होते. उत्तर प्रदेशातील नोएडा या शहराची सर्वात विकसित शहर म्हणून ओळख आहे. परंतु या शहराचं असं दुर्देव आहे की, या शहराला भेट देण्यासाठी कोणताच मुख्यमंत्री सरसावत नाही. कारण जो मुख्यमंत्री या शहराला भेट देतो तो परत कधीच सत्तेवर येत नाही अशी अंधश्रद्धा येथील राजकीय पुढा-यांमध्ये आहे. त्यामुळे यापूर्वी मुख्यमंत्री असलेल्या अखिलेश यादव यांनी पाचवर्षात एकदाही नोएडाचा दौरा केला नव्हता. त्याआधी मायावती मुख्यमंत्री असताना 2007 ते 12 दरम्यान त्या अनेकदा नोएडाला गेल्या पण 2012 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव, कल्याण सिंह आणि राजनाथ सिंह यांनी सुद्धा आपल्या कारकिर्दीत या अंधश्रद्धेला बळच दिले असल्याचं पहावयास मिळालं आहे.
नोएडाबद्दलची ही अंधश्रद्धा 1988 पासून सुरु झाली आहे. त्यावेळचे तत्कालिन मुख्यमंत्री वीर बहाद्दूर सिंह नुकतेच नोएडावरुन परतले होते. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वाने त्यांना राजीनामा द्यायला सांगितला होता. त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द फारशी चमकली नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या घटनेनंतर राज्यातील सर्वच मुख्यमंत्र्यांनी या शहराचा धसकाच घेतला होता.
COMMENTS