ठाण्यात शिवसेना नगरसवेकांत खदखद, महापौरांचा राजीनाम्याचा इशारा !

ठाण्यात शिवसेना नगरसवेकांत खदखद, महापौरांचा राजीनाम्याचा इशारा !

ठाणे – ‘मातोश्री’वरील शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचा प्रकार ताजा असतानाच मंगळवारी ठाणे महापालिकेतही शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले.

महापौर मीनाक्षी शिंदे यांनी बोलाविलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत शिवसेना नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. विरोधकांपेक्षा स्वपक्षातील नगरसेवकच आम्हाला अधिक गोत्यात आणतात, असं म्हणत महापौर शिंदे यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिलाय. या वेळी आक्रमक झालेल्या काही पदाधिकाऱ्यांनी तर ‘आयुक्तांचे वादग्रस्त प्रस्ताव नेत्यांच्या आदेशामुळे आम्हाला मंजूर करावे लागतात आणि टीकेचे धनी व्हावे लागते,’ अशी हतबलता व्यक्त करीत स्वपक्षातील नगरसेवकांवर तोंडसुख घेतले. या वादात पक्षाच्या काही ज्येष्ठ नगरसेवकांनी महापालिकेच्या कारभारात अनियमितता असल्याचा मुद्दा उपस्थित करीत थेट महापौरांवर पलटवार केला.

गटनेत्यांच्या बैठकीस पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वत: उपस्थित राहतील, असे नगरसेवकांना कळविण्यात आले होते. मात्र, पालकमंत्री या बैठकीकडे फिरकले नाहीत. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या महापौरांनी बैठक सुरू होताच ज्येष्ठ नगरसेवकांवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली. सभागृहात विरोधकांपेक्षा आपल्याच पक्षाचे नगरसेवक आम्हाला कोंडीत गाठतात. मी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार काम करते. त्यामुळे काही प्रश्न असतील तर पक्ष बैठकीत उपस्थित करावेत. सभागृहात अशी कोंडी करणार असाल तर मी उद्या पदाचा राजीनामा देईल,’ असा इशारा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिला.

COMMENTS