शेतकऱ्यांच्या नावावर घेतले 328 कोटींचे कर्ज, रासप नेत्याविरोधात गुन्हा दाखल

शेतकऱ्यांच्या नावावर घेतले 328 कोटींचे कर्ज, रासप नेत्याविरोधात गुन्हा दाखल

परभणी – बनावट कागदपत्र तयार करून शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुट्टे यांने मराठवाड्यातील 15 हजार शेतकऱ्यांच्या नावावर तब्बल 328 कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. मात्र, याबद्दल संबंधित शेतकऱ्यांना कल्पनादेखील नव्हती. परभणीच्या गंगाखेड पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री 11 वाजता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

गुट्टे यांनी आंध्र बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक आणि रत्नाकर बँक या सहा बँकांच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलले होते. गुट्टेंच्या मालकीच्या गंगापूर शुगर अँड एनर्जी लिमिटेड या खासगी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावाने हे बोगस कर्ज उचलले आहे.

शेतकऱ्यांना सीबील रिपोर्टमध्ये आपल्या नावावर कर्ज असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी चौकशीला सुरुवात केली. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. गंगाखेड पोलिस स्टेशनला तक्रारीचा अर्ज आला. परंतु चौकशी झाली नाही. त्यात मयत लोकांच्या नावे कर्ज घेतल्याचं उघड झालं.

रत्नाकर गुट्टे हे परळी तालुक्यातील दैठणाघाट येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या पत्नी सुधामती गुट्टे राष्ट्रवादीच्या महिला सरचिटणीस होत्या. रत्नाकर गुट्टे यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून मागील विधानसभा निवडणूक लढवली होती.

 

COMMENTS