‘शिवसंपर्क’ अभियानाकडे नेत्यांनी फिरवली पाठ, उद्धव ठाकरे नाराज

‘शिवसंपर्क’ अभियानाकडे नेत्यांनी फिरवली पाठ, उद्धव ठाकरे नाराज

शिवसेनेच्या संपर्क अभियानाकडे नेत्यांनी पाठ फिरवल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाल्याचे समजते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र याचा इन्कार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आता स्वतः शिवसंपर्क अभियानाकडे लक्ष देण्याचे ठरवले असून नाशिक येथे होणाऱ्या अभियानाच्या तयारीसाठी शुक्रवारी शिवसेना भवनात त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली.

विरोधकांची संघर्ष यात्रा आणि भाजपच्या संवाद यात्रेनंतर शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. मात्र, परिवहनमंत्री दिवाकर रावते, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, मनोहर जोशी, संजय राऊत, अनंत तरे आदी बैठकीस उपस्थित होते.

6 मेपासून शिवसेनेचे संपर्क अभियान सुरू झाले. उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक नेत्याला विभाग वाटून दिले असून जनतेशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यास सांगितले आहे. औरंगाबाद येथे स्वतः उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन शिवसेना नेत्यांशी चर्चा केली. दुसरा टप्पा नाशिकमध्ये सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी नाशिकमधील समस्या जाणून घेण्यास नेत्यांना सांगितले आहे. त्यानुसार काही नेते नाशिकचा दौरा करणार आहेत. 19 मे रोजी ठाकरे स्वत: नाशिकला जाणार आहेत.

दरम्यान, विरोधकांची संघर्ष यात्रा, भाजपची संवाद यात्रा यामुळे शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरू केले का? या प्रश्नावर खासदार संजय राऊत म्हणाले, ‘आम्हाला अशा कोणाच्या यात्रांमुळे संपर्क यात्रा करण्याची आवश्यकता नाही. आमचे शिवसंपर्क अभियान सतत सुरू असते.

मराठवाड्यातील शिवसंपर्क यात्रेत नेते न गेल्याने उद्धव ठाकरे नाराज असून त्यांनी आमदारांना चर्चेसाठी शिवसेना भवन येथे बोलावल्याचे सांगितले जात होते. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी याचा इन्कार केला. संजय राऊत म्हणाले, ही चुकीची माहिती असून अशी कोणतीही बैठक आयोजित करण्यात आली नव्हती. शिवसेना नेते आपले काम योग्यरीत्या करीत असून शिवसंपर्क अभियानावर आम्ही भर देत आहोत.

 

COMMENTS