…ही तर अघोषित आणीबाणीच – अशोक चव्हाण

…ही तर अघोषित आणीबाणीच – अशोक चव्हाण

भाजप सरकारची हुकूमशाहीकडे वाटचाल

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ संवैधानिक अधिकारांचा वापर करून लोकशाही पध्दतीने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना पोलीस बळाचा वापर करून तुरुंगात डांबणे म्हणजे अघोषित आणीबाणीच असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

 

जालना पोलिसांच्या कारवाईचा निषेध करताना अशोक चव्हाण म्हणाले की, सरकारने राज्यात अघोषित आणीबाणीची परिस्थिती निर्माण केली आहे. सत्तेचा आणि पोलीस बळाचा गैरवापर करून सरकार आणि भाजपविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे पोलिसांकडून रितसर परवानगी घेऊन उपोषण करणाऱ्या मानस पगार, हनुमंत पवार, शरद पवार, अक्षय पुराणिक, मयुर लाटे यांच्यासह इतर आंदोलनकर्त्यांना पोलीसी बळाचा वापर करून उपोषणस्थळावरून उचलून पोलीस ठाण्यात डांबण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता पोलीस काहीही माहिती द्यायला तयार नाहीत. सत्तेचा आणि पोलीस बळाचा वापर करून संवैधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकरी पुत्रांचे आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यावरून भाजप सरकारची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे सुरु झाल्याचे दिसून येते, असे अशोक चव्हाण म्हणाले.

 

उस्मानाबाद येथे मुख्यमंत्र्यांसमोर कर्जमाफीची मागणी करणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्याच्या प्रकाराचाही खा. अशोक चव्हाण यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले की, आधी शेतकऱ्यांना शिवीगाळ, नंतर शेतकऱ्यांच्या मुलांना तुरुंगात डांबणे आणि आता कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांवर लाठीमार करेपर्यंत सरकारची मजल गेली आहे. शेतकऱ्यांवर अत्याचार करून हे सरकार फार काळ चालणार नाही. राज्यातले शेतकरी या अन्यायी सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.

COMMENTS