‘ते’ राष्ट्रवादीची बदनामी करण्याचं षडयंत्र – अजित पवार

‘ते’ राष्ट्रवादीची बदनामी करण्याचं षडयंत्र – अजित पवार

सातारा – राष्ट्रवादीची बदनामी करण्याचं षडयंत्र रचलं असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या हत्याकांडाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध नसल्याचं अजितदादांनी म्हटलं आहे. ते साता-यातील सभेत बोलत होते. दोन शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना रविवारी (7 एप्रिल) अटक झाली आहे. तर त्यांचे वडील अरुण जगताप यांच्याविरोधात हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल आहे.

दरम्यान अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान शनिवारी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली. या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण आहे तो शोधून काढा, ती जबाबादारी पोलिसांची आहे. फोन तपासा, कुठे सुई जाते ते तपासा. या सगळ्या तपासात संग्रामचा कुठेही संबंध नसल्याचं सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अशाप्रकारचा प्रकार घडल्यानंतर राष्ट्रवादीचा आमदार म्हणून बदनामी करण्याचं काम चाललेलं आहे. संशयाच्या भोवऱ्यामध्ये त्यांना अडकवण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला आहे.

याप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा- माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह 50 जणांवर कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी ह्त्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

COMMENTS