“नाणारबाबत सेना-भाजपचं वरून किर्तन आतून तमाशा !”

“नाणारबाबत सेना-भाजपचं वरून किर्तन आतून तमाशा !”

रत्नागिरी –  नाणार प्रकल्पाबाबात काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज नाणार सभा घेतली आहे. या सभेदरम्यान त्यांनी सेना-भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. नाणारबाबत सेना-भाजपचं वरून किर्तन आतून तमाशा असल्याची जोरदार टीका त्यांनी केली आहे. तसेच अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही असे मुख्यमंत्री म्हणतात. शिवसेनेची अवस्था एवढी वाईट झाली तरी शिवसेनेला सत्तेत अधिसूचना रद्द करायला १० मिनिटे लागतात. तसेच सुभाष देसाई घोषणा करून गेले १० दिवस झाले अद्याप अधिसूचना रद्द नाही. सत्ताधारी पक्षाचे लोक दलाली खाऊन गुजराती लोकांना जमिनी मिळवून देत असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना चव्हाण यांनी शेतक-यांच्या प्रश्नाबाबतही सरकारवर घणाघात केला आहे. घरा दारांवर शेतावर नांगर फिरवून विकास नको, शेतक-यांच्या जमिनी बळकावण्याचा सरकारचा प्रयत्न असून इंग्रजकाळापेक्षा जास्त दंडेलशाही सुरु असल्याची टीकाही चव्हाण यांनी यावेळी केली आहे. तसेच काँग्रेस पक्ष नाणार वासियांसोबत मिळून हा लढा लढणार असून काँग्रेस पक्ष लोकांसोबत राहणार असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच रिफायनरी माध्यमातून कोकण उध्वस्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे पण कोकणी जनता हे सरकार उद्ध्वस्त करेल असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

COMMENTS