भाजप खासदारानं घेतली अशोक चव्हाणांची भेट, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

भाजप खासदारानं घेतली अशोक चव्हाणांची भेट, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

पुणे – भाजप खासदारानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पुण्यातील भाजपचे खासदार संजय काकडे यांनी चव्हाणांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही नेत्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. संजय काकडे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. परंतु भाजपाने तिकिट दिले नाही तर काँग्रेसकडून तिकीट घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये एका विवाह सोहळ्यानिमित्त ही भेट झाली असल्याची माहिती आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच संजय काकडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीकडूनही त्यांना तिकीट दिलं जाणार असल्याचं बोललं जात होतं. अनेकवेळा त्यांनी भाजपवरही टीका केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावऱ भाजपला मोठा धक्का बसू शकतो असाही अंदाज वर्तवला जात आहे.

 

COMMENTS