राज्यात भाजपने आणखी तीन खासदारांचा पत्ता कापला, काँग्रेसचीही तिसरी यादी जाहीर !

राज्यात भाजपने आणखी तीन खासदारांचा पत्ता कापला, काँग्रेसचीही तिसरी यादी जाहीर !

नवी दिल्ली – भाजप आणि काँग्रेसनं लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. भाजपनं जळगावमधून विद्यमान खासदार ए टी पाटील यांना डच्चू दिलाय. त्यांच्या ऐवजी विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे स्मिता वाघ यांची लढत राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्याशी होणार आहे. नांदेडमधून अशोक चव्हाण यांची काँग्रेसकडून संभाव्य उमेदवारी लक्षात घेऊन त्यांचे कट्टर विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांना मैदानात उतरवलं आहे. चिखलीकर हे सध्या शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ते शिवसेनेपासून दूर गेले आहेत.

दिंडोरी या अनुसुचित जमातीच्या जागेसाठी कालच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या भारती चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पुण्यातून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना कात्रजचा घाट दाखवण्यात आला आहे. शिरोळे यांच्याऐवजी भाजपने पालकमंत्री गिरीश बापट यांना मैदानात उतरवले आहे. बारामतीमधून दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सोलापूरमधून विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी जयसिद्धेश्वर स्वामी यांना सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात रिंगणात उतरवण्यात आलं आहे. माढा, भंडारा गोंदिया आणि मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघात भाजपने अजून उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

भाजपचे उमेदवार

जळगांव – स्मिता वाघ

नांदेड – प्रताप चिखलीकर

दिंडोरी – डॉ. भारती पवार

पुणे – गिरीष बापट

बारामती – कांचन कुल

सोलापूर – जयसिद्धेश्वर स्वामी

काँग्रेसची महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचे बाळू धानोरकर यांच्या नावाची चर्चा होती. औरंगाबाद मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडला जाण्याची शक्याता होती. त्याही ठिकाणाहून विधान परिषदेचे सदस्य सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जालन्यातून विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भिवंडीतून पुन्हा एकदा माजी खासदार सुरेश टावरे यांना संधी देण्यात आली आहे. तर लातूरमधून मच्छिंद्र कामत यांना संधी देण्यात आली आहे. नांदेड आणि हिंगोली या दोन खासदार असलेल्या ठिकाणी काँग्रेसनं अजून उमेदवार जाहीर केलेला नाही.

काँग्रेसची तिसरी यादी….

चंद्रपूर – विनायक बांगडे

जालना – विलास औताडे

औरंगाबाद – सुभाष झांबड

भिवंडी – सुरेश टावरे

लातूर – मच्छिंद्र कामंत

COMMENTS