नाशिकमध्ये  नारायण राणेंचं सूचक विधान, राजकीय कुजबूज सुरू !

नाशिकमध्ये नारायण राणेंचं सूचक विधान, राजकीय कुजबूज सुरू !

नाशिक – नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नारायण राणे उतरणार असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल नाशिकमध्ये केलेल्या सूचक विधानाने जिल्ह्यात राजकीय कुजबूज सुरू झाली आहे. नाशिकमध्ये कोकणवासिय नागरिकांकडून रत्नसिंधू महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. त्यासाठी राणे नाशिकमध्ये आले होते. मात्र या कार्यक्रमापेक्षा त्यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांसोबत घेतलेल्या बैठकीचीच जास्त चर्चा झाली. तसचं नाशिकमध्ये येण्यामागे आपला स्वार्थ असल्याचं सूचक वक्तव्यही राणे यांनी केलं. त्यामुळे वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

पुढील सहा महिन्यात नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. राणेंना मंत्रिमंडळात घ्यायचे असल्यास सहा महिन्याच्या आत त्यांना आमदार म्हणून निवडूण आणावे लागणार आहे. त्यामुळेच त्यांना नाशिकमधून रिंगणात उतरवण्याचे भाजपचे प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. महापालिकेतील सत्ता, नुकत्याच झालेल्या त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील मिळालेली सत्ता आणि जिल्हाभरात भाजपची वाढलेली ताकद, नारायण राणे यांची शक्तीस्थाने याच्याबळावर नाशिकची जागा खेचून आणू या अशी भाजपच्या नेत्यांना अपेक्षा आहे. त्यामुळेच त्यांना रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचं बोलंलं जातंय.

राणेंना नाशिकमध्ये उतरवण्यामागे शिवसेनेला शह देण्याचीही भाजपची खेळी असल्याचं बोललं जातंय. तसंच छगन भुजबळ यांची उरली सुरली ताकद संपवण्याचीही भाजपची चाल आहे अशीही चर्चा आहे. येत्या काही दिवसात भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यास त्यांनी पुन्हा जिल्ह्यात हातपाय पसरू नये अशी व्यवस्था भाजपकडून करण्यात येत असल्याचं बोललं जातंय. मात्र विधान परिषद निवडणुकीप्रमाणे इथेही राणेंच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर राणेंची अडचण होऊ शकते. त्यामुळे इथेही जागा जिंकणे भाजपला किंवा राणेंना सोपं नाही.

COMMENTS