उत्तुंग उंचीच्या प्रवासाबरोबर सहप्रवासाचा योग, शरद पवारांसोबतच्या दिल्ली प्रवासावर आमदार निलेश लंकेंचा लेख ! वाचा

उत्तुंग उंचीच्या प्रवासाबरोबर सहप्रवासाचा योग, शरद पवारांसोबतच्या दिल्ली प्रवासावर आमदार निलेश लंकेंचा लेख ! वाचा

मुंबई – सैन्य दलाच्या के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील 23 गावांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गावांमधील लोकसंख्या ही आदिवासीबहुल असून त्यांची उपजीविका आणि सुरक्षेचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीनंतर निलेश लंके यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. यामध्ये ते काय म्हणालेत ते वाचा..

निलेश लंके यांची फेसबुक पोस्ट

या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब खऱ्या अर्थाने ज्ञान आणि अनुभवाचे विद्यापीठ आहे. प्रत्येक क्षेत्रात साहेबांचा दांडगा अभ्यास आहे. लहान-लहान बारकावे त्यांना ठाऊक असतात. गेल्या दीड वर्षांपासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करीत आहे. साहेबांना या अगोदर अनेकदा भेटलो, मात्र त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. भेटण्यासाठी येणाऱ्यांची मोठी संख्या, अनेक कामांमध्ये व्यस्तता असल्याने ते शक्य झाले नाही. मात्र हा योग जुळून आला तो शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजी, पारनेर सह, राहुरी आणि नगर या तालुक्यांमध्ये के के रेंज विस्तारीकरणाकरीता जमीन संपादित करण्यात येऊ नये याकरता आमचा लढा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कानावर हा विषय अगोदर घातला होता. शेतकऱ्यांचे दुःख आणि प्रश्न जाणून घेणारे इतर दुसरे नेतृत्व आज तरी साहेबांशिवाय दुसरे कोणी नाही. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात साहेबांनी फोन केला. मात्र संरक्षण मंत्री कार्यालयात नसल्याने बोलणे झाले नाही. परंतु काही वेळातच साहेबांना राजनाथ सिंह साहेबांचा फोन आला. आणि भेटीची वेळ ठरली, शुक्रवारी याबाबत चर्चा करण्यासाठी लष्कर प्रमुख यांनाही बोलावण्यात आले. हा प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला मांडण्याची संधी साहेबांनी दिली.

माझे सर्व मुद्दे कसे योग्य आहेत, हे पवार साहेबांनी संरक्षण मंत्री तसेच लष्कराच्या अधिकाऱ्यांना पटवून दिले. याबाबत संरक्षण विभागाने त्वरित सकारात्मक निर्णय घेतला. त्यानंतर या ठिकाणाहून बाहेर आल्यानंतर तुम्ही कधी जाणार आहात असा प्रश्न पवार साहेबांनी मला विचारला. संध्याकाळी निघणार असल्याचे मी सांगितले. तू माझ्यासोबत मुंबईला चल असे साहेबांनी मला सांगितले. आणि त्यांच्यासोबत विमानाने पवार साहेब मला घेऊन आले. दीड तासाच्या प्रवासामध्ये साहेबांनी माझ्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. विशेष करून संरक्षण खात्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव असल्याचे दिसून आले. ते संरक्षण मंत्री असताना युद्धबंदी करार कशा पद्धतीने करण्यात आला. त्यामध्ये कोण कोणत्या अटी आहेत. त्याचे उल्लंघन झाल्यानंतर काय परिणामांना सामोरे जावे लागेल. याबाबत पवार साहेबांनी मला सविस्तर माहिती दिली.

भारत-चीन संबंध, त्यांनी केलेला चीनचा दौरा याविषयी साहेब भरभरून बोलले. संरक्षण खात्याची व्याप्ती किती मोठी आहे. याचा प्रत्यय मला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आला. लहान लहान आणि तितक्याच महत्त्वाच्या बाबींची शरद चंद्रजी पवार साहेबांकडून मला माहिती मिळाली. याशिवाय मराठा आरक्षणाबाबत सुद्धा पवार साहेबांनी एक आमदार म्हणून माझं मत विचारले. इतक्या मोठ्या उंचीच्या नेतृत्वाकडूनही माझ्यासारख्या नवीन आमदाराचे मत विचारात घेतले जाते. यावरून साहेबांचे उदार मत आणि मोठ्या मनाची उंची दिसून आली. काही दिवसांपूर्वी शरदचंद्रजी पवार साहेब यांचा लहानपणाचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्याबाबतही साहेब भरभरून बोलले. हास्यविनोद करून विमानातील वातावरण अल्हाददायक केले. मध्येच आपले प्लेन कुठे आले आहे. आपण किती उंचावर आहे, त्याचबरोबर तापमान किती आहे. याबाबत पवार साहेब मला माहिती देत होते. पवार साहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्व बरोबर मला अशाप्रकारे विमान प्रवास करता येईल. हे मी स्वप्नातही पाहिले नव्हते, मात्र नियतीने, आणि माझ्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनते मुळे हा योग आला. विविध विषयांवर चर्चा आणि गप्पा इतक्या रंगल्या होत्या की मुंबई विमानतळावर विमान कधी लँड झाले हे समजलेच नाही. पवार साहेब अत्यंत प्रेमळ, संवेदनशील असे व्यक्तिमत्व आहे.

अल्पावधीतच मला त्यांनी आपलेसे केले, मला काम करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली. साहेब खर्‍या अर्थाने माझी ऊर्जा आहे, ते माझे पाठबळ आहे, आणि माझे पाठीराखे सुद्धा आहेत. त्यांच्यासोबत विमान प्रवास करीत असताना जो अनुभव आला त्यामुळे मला अधिकच बळ मिळाले आहे. समाजासाठी काम करण्याची एक प्रकारे अधिक पटीने उर्मी वाढली आहे. साहेब पाठीवर हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा! इतकच यानिमित्ताने मी सांगू शकेल!

COMMENTS