गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचा पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रवास, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत रुईकर यांचा ब्लॉग !

गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचा पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रवास, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत रुईकर यांचा ब्लॉग !

मुंबई –  बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बालकविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत रुईकर यांनी ब्लॉग लिहिला आहे. रुईकर यांनी लिहिलेला ब्लॉग जशास तसा…..

मास लिडर !

“पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ” असं नेहमी म्हटलं जातं कारण घराण्याचं नाव उज्वल करण्याची जबाबदारी मुलावर असते मात्र राज्याच्या ग्रामविकासमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी घराण्याचं नाव उज्वल करण्याचं काम केवळ मुलंच करू शकतात हा समज खोटा ठरवला आहे,गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा यांनी ज्या पद्धतीने कारभार आपल्या खांद्यावर पेलला ते पाहता मुलीदेखील कोठे कमी नाहीत हाच संदेश दिला आहे .राज्य भाजप मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा मास लिडर कोणीच नव्हता मात्र त्यांच्या निधनांनातर ही पोकळी पंकजा मुंडे यांनी भरून काढली आहे .आज त्यांना मास लिडर म्हणून मान्यता मिळाली आहे हे नक्की .

केंद्रात भाजप सरकार आरूढ झालं आणि भाजपला गोपीनाथ मुंडे यांच्या सारख्या नेत्याला गमवावं लागलं,अचानक आलेल्या या दुर्दैवी प्रसंगातून भाजप आणि मुंडे परिवार कसा सावरणार हाच प्रश्न होता मात्र पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या पावलावर पाऊल टाकत भाजप आणि मुंडे परिवाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली .गेल्या चार वर्षातील पंकजा यांच्या कारभारावर नजर टाकल्यास आज त्या भाजपमधील टॉप फाईव्ह मध्ये आहेत हे निश्चित .

गोपीनाथ मुंडे यांची चालण्याची,बोलण्याची लकब हुबेहूब पंकजा यांच्या मध्ये दिसून येते.सुरवातीच्या वर्षभराच्या काळात त्यांनी मुंडेंच्या जुन्या सहकाऱ्यांना दूर केले त्या कोणाचेच ऐकत नाहीत,आपलंच चालवतात अशी चर्चा झाली.मात्र हळूहळू पंकजा मुंडे यांची कार्यपद्धती लोकांच्या ,कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आणि त्यांची लोकप्रियता वाढली .

“मैने एक बार कमिटमेंट की तो फिर मैं खुदकी भी नही सूनता ” हा सलमानचा डायलॉग त्या तंतोतंत अमलात आणतात हे  अनेकवेळा दिसून आले आहे .आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे त्या सुरवातीच्या काळात अडचणीतही आल्या,मीडियामध्ये त्यांच्या अनेक वक्तव्यावरून जोरदार चर्चा देखील झाली मात्र जसजसा काळ लोटत गेला तसतसा राजकारणातील पोक्तपणा त्यांच्या अंगी दिसू लागला.

राज्याच्या चांदया पासून ते बांद्या पर्यंत आज त्यांची क्रेझ आहे,केवळ वंजारी समाजातच नव्हे तर सर्व समाजात त्यांना मानणारा एक वेगळा वर्ग तयार करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत .मुली असोत की महिला यांच्यासाठी सॅनिटरी नॅपकिन चा प्रश्न असो की जलयुक्त शिवार अथवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे.शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करून त्यांनी बदल्यामधील सावळा गोंधळ बंद केला.

“घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी ” या प्रमाणे पंकजा मुंडे यांनी राज्याचे राजकारण करताना कायम बीड जिल्ह्याच्या विकासाचा विचार केल्याचे दिसून येते,नगर बीड परळी रेल्वेचा प्रश्न असो की जिल्ह्यातून जाणाऱ्या नऊ राष्ट्रीय महामार्गांचा,प्रत्येक विषयात स्वतः लक्ष देऊन त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी बीड जिल्ह्यासाठी खेचून आणला आहे .बीड जिल्हा परिषद असो की नुकतीच झालेली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो त्यांनी आपल्या राजकीय प्रगल्भतेचे दर्शन दिले आहे .सुरेश धस यांच्यासारख्या राष्ट्रवादीतील रांगड्या राजकारण्याला सोबत घेत आपण गरज पडली तर बेरजेचे राजकारण करू शकतो हे दाखवून दिले आहे .या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी च्या लोकांना देखील गळाला लावण्याचे काम केल्याचे निकालानंतर दिसून आले आहे .या निवडणुकीने त्यांच्यातील धूर्त राजकारणी देखील सर्वांसमोर आला .
राजकारणात कोणीही कायम सत्तेत राहील याची शाश्वती नसते याचे भान पंकजा यांना असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे .मात्र हे भान असतानाही अनेकवेळा त्या घाई करतात,समोरच्याच समजून घेत नाहीत अशी देखील तक्रार केली जाते .”हम हम है बाकी सब पाणी कम है ” याची प्रचिती पंकजा मुंडे यांच्या स्वभावातून दिसते हे मात्र नक्की .

चोवीस तास राजकारण करण्याला मात्र त्यांचा विरोध असल्याचं जाणवतं .निवडणुकीपूरता विरोध असावा मात्र त्यानंतर विकासाचा दृष्टिकोन ठेवून काम करावे असा त्यांचा नेहमी आग्रह असतो . राज्यात आज भाजपकडे मास लिडर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर पंकजा मुंडे हाच पर्याय आहे हे नाकारून चालणार नाही . राजकारणासोबतच ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला असल्याचं दिसून येत .ग्रामविकास सारख्या मंत्रालयाला एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या कामाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन त्यांचा विशेष गौरव केला यातच सगळे आले .

राजकारण हे वारसा हक्कानं वाट्याला आलं असलं तरी ते टिकवण्यासाठी तेवढी क्षमता असावी लागते हे पंकजा यांनी वारंवार सिद्ध केलं आहे,गोपीनाथ मुंडे यांची उणीव राज्याला नेहमीच भासत राहणार यात शंका नाही मात्र त्यांची आठवण कायम राहावी यासाठी पंकजा मुंडे यांनी देखील मेहनत घेतली आहे हे वास्तव आहे . जे आहे ते तोंडावर बोलून मोकळं व्हायचं,हो तर हो नाही तर नाही हे स्पष्टपणे सांगायचं,शब्द देताना विचार करायचा आणि दिलेला शब्द पाळायचा या त्यांच्या स्वभाव गुणांमुळे त्या अनेकदा चर्चेतही राहील्या मात्र माझी भूमिका स्पष्ट आणि क्लियर असते त्यामुळे मी त्यावर ठाम असते असं त्या अनेकदा सांगतात .त्यातूनच त्यांच्या नॉनव्हेज चा विषय चर्चेत आला होता मात्र त्याबाबत जाहीरपणे कबुली देऊन त्यांनी पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणाची झलक दाखवून दिली होती .भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते,लाखा लाखाच्या सभा गाजवणाऱ्या म्हणून आजच्या राजकारणात त्यांनी स्थान मिळवले आहे. मुंडेंच्या निधनानंतरच्या अवघ्या साडेतीन वर्षात त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केले आहे ते पाहता त्या लंबी रेस का घोडा ठरणार यात शंका नाही,त्यांच्या राजकीय उज्वल भविष्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा !

लक्ष्मीकांत रुईकर ,बीड

https://lakshmikantruikarblog.blogspot.com/2018/07/blog-post.html

COMMENTS