‘तुझ्यावर बलात्कार करावासा वाटतो’ मोदी विरोधात लिहल्याने या महिला पत्रकाराला धमक्या! बनावट अश्लील फोटो, व्हिडिओ केले व्हायरल

‘तुझ्यावर बलात्कार करावासा वाटतो’ मोदी विरोधात लिहल्याने या महिला पत्रकाराला धमक्या! बनावट अश्लील फोटो, व्हिडिओ केले व्हायरल

मी नेहमी सरकारच्या विरोधात माझी भूमिका मांडत असल्याने मला त्याची इतकी भयंकर शिक्षा मिळेल याची मी स्वप्नात ही कल्पना केली नव्हती. मी सरकारच्या विरोधात माझी ठामपणे भूमिका मांडायचे पण मला काहीही कळायच्या आतच माझे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर पसरले. या घटनेमुळे मला लोकांच्या टीकेचा भडिमार सहन करावा लागला. लोक माझ्या त्या फोटोंवरून सातत्याने शेरेबाजी करत होते. तो एक बनावट ट्विट होता त्यात माझा मॉर्फ करण्यात आलेला फोटो वापरण्यात आला होता असे राणा अय्यूब या मुक्त पत्रकाराने वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. राणा अय्यूब ही मुक्त पत्रकार तिच्या परखड आणि आक्रमक लेखांसाठी ओळखली जाते. सत्ताधाऱ्यांविरोधात तिची लेखणी तलावारीप्रमाणे चालते. मात्र याच मुक्त पत्रकाराची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्याबद्दल बोलताना हे सगळे माझ्यासाठी अनपेक्षित होते असे राणा अय्यूबने म्हटले आहे. हे फोटो इतक्या वेगाने पसरले की त्याची मला कल्पना येण्याधीच ते व्हायरल झाले होते. माझ्या सरकारविरोधी लिखाणामुळेच मला हे सहन करावे लागले असेही तिने म्हटले आहे.

मला अनेकांनी या मॉर्फ फोटोंचे रिट्विट पाठवले. ‘तुझ्यावर बलात्कार करावासा वाटतो’ इतक्या खालच्या भाषेत प्रतिक्रियाही लिहून पाठवल्या. तसेच मला जीवे मारण्याच्या धमक्याही येऊ लागल्या. मला तुला निराश करायचे नाही पण तुला मी असे काही मेसेजेस पाठवतो आहे ज्यामुळे तू निराश होऊ शकतेस असे मला मित्र सांगायचे तेव्हा मला काय प्रतिक्रिया देऊ ते समजायचेच नाही असेही राणा अय्यूबने म्हटले आहे. ते मित्र मला त्यांना त्यांच्या फोनवर आलेले माझे मॉर्फ अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवत. त्यानंतर तर कहरच झाला, I am available या मेसेजसह माझे ट्विटर हँडल व्हायरल झाले त्यामध्ये माझा मोबाईल क्रमांक आणि पत्ताही होता. त्यानंतर लोक मला फोन करून ‘रेट’ विचारू लागले. गेल्या काही आठवड्यात मी मानसिक दृष्ट्या नरकयातना काय आहेत याचा अनुभव घेतला आहे. पोर्नोग्राफीतले व्हिडिओही माझ्या फोटो आणि व्हिडिओजसोबत जोडले गेले. एखादी व्यक्ती माझा शत्रू असेल तर त्या व्यक्तीलाही इतका भयंकर अनुभव येऊ नये अशी मी प्रार्थना करते असेही राणाने म्हटले आहे.

COMMENTS