मुख्यमंत्र्यांनी किती लोकांना दाम आणि दंड दिला ? याची चौकशी करून कारवाई करा – सचिन सावंत

मुख्यमंत्र्यांनी किती लोकांना दाम आणि दंड दिला ? याची चौकशी करून कारवाई करा – सचिन सावंत

पालघर – साम, दाम, दंड, भेदाचा वापर करू असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला? तसेच कुठे भेद केला ? याची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप संदर्भात काँग्रेससह बहुपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिका-यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर लायन्स क्लब हॉल येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना सावंत म्हणाले की, ऑडिओ क्लिपमधील मुख्यमंत्र्यांची भाषा ही आश्चर्यकारक, धक्कादायक आणि लोकशाहीला घातक आहे. यामध्ये साम, दाम, दंड, भेद असे शब्द वापरत असताना मुख्यमंत्र्यांकडून किती लोकांना दाम दिला? किती लोकांना दंडीत केले? व कुठले भेद केले? याची विचारणा निवडणूक आयोगाने करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपचे पेन ड्राईव्ह तक्रारीसह निवडणूक अधिका-यांना देऊन केली. मुख्यमंत्र्यांच्या संभाषणातून राज्याला दादागिरी करणारा मुख्यमंत्री लाभला आहे आणि त्यांचे लोकशाहीबाबतचे विचार किती उच्च आहेत हे राज्यातील जनतेला कळाले ते बरे झाले असा टोला सावंत यांनी लगावला.

साम, दाम, दंड, भेद ही भाषा कोणत्या ‘पारदर्शक’ शब्दकोषातून कुटनितीशी जोडली जाऊ शकते आणि कुटनिती लोकशाहीमध्ये केव्हापासून मान्य झाली याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिले पाहिजे. या निवडणुकीमध्ये भाजपकडून सत्ता आणि पैशाचा प्रचंड गैरवापर सुरु असून अनधिकृत होर्डिंग भाजपचेच आहेत. मतदारांना पैसे वाटप करताना भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. त्यामुळे हे सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने झाले असावेत असा निष्कर्ष मुख्यमंत्र्यांच्या संभाषणातून निघतो. काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा या मागणीवर ठाम आहे असे सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री सातत्याने आचारसंहितेचा भंग करित आहेत हे दुर्देवी आहे. या अगोदरही अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी सराईतपणे आचारसंहितेचा भंग केला. काँग्रेस पक्ष वारंवार याबाबत निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह तक्रारी दाखल केल्या आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी स्वतः आचारसंहितेचे पालन करून स्वतः राज्यातल्या जनतेपुढे आदर्श ठेवणे अभिप्रेत आहे. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणात जनतेला आमिषे दाखवून आचारसंहितेचा भंग केला अशी तक्रार काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे केली होती त्यावर अद्यापही समाधानकारक कारवाई झाली नाही. त्यामुळे निवडणूक आयोग सत्तेच्या दबावाखाली काम करत आहे का? अशी भावना जनमानसात निर्माण  झाली आहे असे सावंत म्हणाले.

भाजपच्या सत्ताकाळात मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली लोकशाही धोक्यात आली आहे अशी चिंता ज्यांना वाटत असेल त्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करावी असे आवाहन काँग्रेस पक्षाने केले होते. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन विकास आघाडीने आज काँग्रेससोबत येऊन मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केली.

COMMENTS