शिवसेनेचा अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या संपाला पाठिंबा

शिवसेनेचा अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या संपाला पाठिंबा

मुंबई –  विविध मागण्यांसाठी गेल्या 9 दिवसांपासून संपावर असलेल्या राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागासोबत झालेली बैठक फिस्कटल्यानंतर आज अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांनी शिवसेना भवनात जाऊन उद्धव ठाकरे यांच्यांशी यासंदर्भात भेट घेतली. राज्यातील प्रत्येक शिवसैनिक अंगणवाडी ताईंच्या पाठिशी उभा राहील, अशी खात्री यावेळी उद्धव यांनी दिल्याचे कृती समितीचे नेते दिलीप उटाणे यांनी सांगितले.

महिला व बालविकास विभागाने ‘मागीलवर्षीप्रमाणे आपल्या मानधनात वृद्धी पाहिजे असेल, तर हा संप मागे घ्या. संप मागे घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही,’ अशी भूमिका घेतल्याने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत सुरू असलेली चर्चा फिस्कटली आहे.

दरम्यान, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चिघळू नये यासाठी महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची तातडीची बैठक बोलावली होती. त्यात वित्त विभागाने अंगणवाडी कर्मचा-यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव फेटाळल्याचे मुंडे यांनी सांगितले, शिवाय नवा प्रस्ताव तयार करण्यासाठी मंगळवारी सचिवांच्या नेतृत्त्वाखाली बैठकीचे आयोजन केले. मात्र, मंगळवारी दुपारी बैठकीसाठी गेलेल्या कृती समितीच्या नेत्यांना उभे राहूनच संप मागे घेतल्याशिवाय वाटाघाटी करणार नसल्याचे, सचिव विनिता वेद सिंघल यांनी सांगितल्याचा आरोप कृती समितीचे नेते दिलीप उटाणे यांनी केला आहे, ही अत्यंत वाईट पद्धत होती. त्यामुळे एकमुखाने संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीने घेतल्याचेही उटाणे यांनी स्पष्ट केले.

 

COMMENTS