अखेर 80 वर्षाच्या आईला मिळाला न्याय !

अखेर 80 वर्षाच्या आईला मिळाला न्याय !

उस्मानाबाद – 80 वर्षीय आईला सांभाळण्यास नकार देणार्‍या मुलाने आईच्या जीवनचरितार्थासाठी महिन्याला दहा हजार रूपये निर्वाह खर्च देण्याचा आदेश उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी आयुषप्रसाद यांनी शनिवारी दिला आहे. उदरनिर्वाहासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजविणार्‍या आईला तीन महिन्यात न्याय मिळाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील शेकापूर येथील 80 वर्षे वय असलेल्या शशिकलाबाई बापूराव नरगिडे यांचे पती मयत आहेत. त्यांचा अतुल बापूराव नरगिडे हा मुलगा सरकारी नोकदार असूनही सांभाळत नव्हता. नरगिडे हे नळदुर्ग पालिकेत नोकरी करतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. दोघांचा महिन्याकाठी सरासरी ७० हजार रूपये पगार तसेच १० ते १२ हजार रूपये घरभाड्यापोटी मिळतात. मात्र ते वृध्द आईस सांभाळत नव्हते. त्यामुळे शशिकलाबाई नरगिडे यांनी उपविभागीय अधिकार्‍यांकडे २४ जानेवारी २०१७ रोजी ऍड. डी. एन. सोनवणे यांच्यामार्फत निर्वाह खर्च मिळण्यासाठी अर्ज केला होता. या प्रकरणाची सुनावणी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषप्रसाद यांच्यासमोर झाली. त्यानुसार आयुषप्रसाद यांनी २९ एप्रिल २०१७ रोजी निकाल देत शशिकलाबाई यांचा मुलगा अतुल नरगिडे यास आईचा दवाखाना, औषधोपचार, खाण्यापिण्यासाठी व राहण्यासाठी दर महिन्याला १० हजार रूपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे ऐंशी वर्षीय आईला कायद्यामुळे जगण्यासाठी आधार मिळाला आहे.

COMMENTS