मराठवाड्याच्या नेतृत्वाचे केंद्र बदलत आहे ?

मराठवाड्याच्या नेतृत्वाचे केंद्र बदलत आहे ?

विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे या मराठवाड्यातील नेत्यांनी गेली तीन दशके मराठवाड्याचं आणि राज्याचं नेतृत्व केलं. दोन्ही नेत्यांच्या राजकारणात अनेक चढ उतार आले, परंतु तरीही मराठवाड्यात त्यांना पर्यायी नेतृत्व उभं राहु शकलं नाही. आता मात्र या दोन्ही नेत्यांच्या अकाली निधनानं नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याचं चित्र आहे.

विलासराव देशमुख यांचा वारसा त्यांचे पुत्र अमित देशमुख चालवत आहेत. त्यामध्ये त्यांना म्हणावं तेवढं यश आलेलं दिसत नाही. वास्तविक विलासराव देशमुख यांच्या हयातीमध्येच अमित देशमुख यांच्याकडं लातूर शहरची आमदारकी आली. त्यानंतर पहिल्यावाहिल्या लातूर महापालिकेतही अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं घवघवीत यश मिळवलं. विलासराव देशमुखांच्या निधनानंतर मात्र अमित देशमुखांना लातुरचा किल्ला सांभाळता येत नाही असं चित्र आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी लातूर शहरमध्ये आणि त्यांच्या समर्थकाने लातूर ग्रामिणमध्ये विजय संपादन केलेला असताना इतर विधानसभा क्षेत्रात मात्र काँग्रेसला दारुण पराभव स्विकारावा लागला. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीतही काँग्रेसला अपयश आलं. एवढचं नाही तर स्थापनेपासून कधीही पराभव न पाहिलेल्या काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषदेमध्ये सत्तेबाहेर राहवं लागलं. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीतही पक्षाला मानहानीकरारक पराभव स्विकारावा लागला. विलासराव देशमुखांच्या पश्चात पहिल्यांदाच काँग्रेसच्या मागे पराभवाची मालिका लागली आहे. जिल्हा ताब्यात ठेवण्यात अपयश येत असल्यामुळे अर्थातच अमित देशमुख यांना जिल्ह्याबाहेरच्या किंवा मराठवाड्याच्या नेतृत्वाला आपसूकच मर्यादा आल्या आहेत.

दुसरीकडे जिल्ह्यात काही ठरावीक पॉकेट्स सोडली तर फारशी ताकद नसलेल्या भाजपनं यंदा जिल्ह्यात विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या नगरपालिका निवडणुकत चांगलं यश मिळवलं. एवढच नाही तर आजपर्यंत कधीही न जिंकलेली जिल्हा परिषदेमध्ये स्पष्ट बहुमत मिळवलं. त्यानंतर महापालिकेतही झिरो पासून हिरो बनण्याचा मान भाजपनं मिळवला. अर्थात यामागे  नियोजन आणि ताकद देण्याचं काम कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं. त्यामुळं जिल्ह्यात कमळ फुलवण्याचं श्रेय संभाजी पाटील निलंगेकर यांना द्यावं लागेल. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्यासारखे दिग्गज असतानाही जालना आणि औरंगाबादमध्ये पक्षाला यश मिळवता आलं नाही. तर पंकजा मुंडेंना गोपीनाथराव मुंडेंचा वारसा आणि तगड मंत्रीपद असतानाही एकहाती विजय मिळवता आला नाही. मराठवाड्यात पक्षाला लातूरएवढं यश मिळालं नाही. त्यामुळेच  लातूरच्या विजयाचं मोल मोठं आहे. याचं सर्व श्रेय संभाजी पाटील निलंगेकरांना जातं. त्यामुळंच भाजपच्या मराठवाड्याचं नेतृत्व पुढील काळात निलंगेकर यांच्याकडं जाईल अशी शक्यता आता वर्तविली जात आहे.

तिकडे गोपीनाथराव मुंडेचा वारसा त्यांच्या कन्या पंकजा मुंडे या सांभाळत आहेत. मात्र सहानुभुतीची निवडणूक सोडली तर नंतरच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना फारसे यश आल्याचं दिसत नाही. मुंडेंच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पंकजा यांच्या बहिणीचा एकतर्फी विजय झाला. तर विधानसभा निवडणुकीत सहापैकी पाच जागा भाजपनं जिंकल्या. त्यानंतर मात्र भाजपला जिल्ह्यात फारसे यश आले नाही. उलट पंकजा यांच्या स्वतःच्या परळी मतदारसंघात परळी नगरपालिकेत त्यांना अत्यंत मानहानीकारक पराभवाला सामोरं  जावं लागंल. त्यानंतर जिल्हा परिषदेत परळी विधानसभा क्षेत्रात तर त्यांना काहीच चमक दाखवता आली नाही. जिल्हा परिषदेतही केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटाफुटीमुळे कसाबसा भाजपचा अध्यक्ष जिल्हा परिषदेत बसला. म्हणूच एकेकाळी मुख्यमंत्रीपदाच्या एक प्रबळ दावेदार समजणा-या पंकजा मुंडे या काहीशा बॅकफूटवर आल्याचं दिसून येत आहे. जिल्ह्यातील या सलग पराभवामुळे त्यांना मराठवाड्यातील भाजपच्या नेत्या म्हणून मर्यादा येत आहेत.

दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी विधानसभेतील पराभवानंतरही पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येतंय. त्यांच्यामधले गुण हेरुनच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेची संधी देत थेट विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर दाखवलेला विश्वासही योग्य असल्याचं ते दाखवून देत आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची प्रभावी कामगिरी राहिली आहे. विधानसभेतील पराभवानंतर त्यांनी परळी नगरपालिका आणि परळी विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद गट यांच्यात एकहाती विजय मिळवले. एवढच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी जिल्हा परिषदेत विजयाच्या जवळपास नेलं. मात्र सुरेश धस यांच्या बंडखोरीमुळं राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेतील सत्तेपासून दूर राहवं लागलं.

अर्थात संभाजी पाटील निलंगेकर आणि धनंजय मुंडे यांना आपलं नेतृत्व प्रस्थापीत करणं तेवढं सोपही नाही. विरोधी पक्षातून आणि   स्वपक्षातूही त्यांना शह काटशह मिळू शकतो. त्याचबरोबर आताच या चारही नेत्यांच्या नेतृत्वाविषयी निष्कर्षाप्रती येणं हे जरा घाईचच होईल. मात्र वारं कोणत्या दिशेनं वाहतंय याचा अंदाज मात्र यतोय.

COMMENTS