“अमित शाह यांनी भाजपाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा”

“अमित शाह यांनी भाजपाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा”

मुंबई – भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांच्या कंपनीची उलाढाल एका वर्षात १६ हजार पटींनी कशी वाढली, याबाबत वेबपोर्टलने  बातमी दिली होती.  अमित शाह यांचे पुत्र जय शाह आणि त्यांच्या  मित्राने २००४ मध्ये टेम्पल एन्टरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली होती. या कंपनीने २००४ ते १४ पर्यंत कोणताही व्यवहार  केला नाही.  मात्र भाजपचे सरकार येताच  २०१४-१५ या वर्षात कंपनीची उलाढाल सुरू झाली. केवळ ५० हजार रुपयांचे भाग भांडवल असलेल्या या कंपनीने अवघ्या ३ वर्षात म्हणजे २०१७ ला कंपनीची उलाढाल ८० कोटी ५० लाख झाली. म्हणजे या कंपनीला १६ हजाराच्या पटीने फायदा झाला. यामध्ये काहीतरी गडबड असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. ही कंपनी नोटाबंदीच्या आधी म्हणजेच ८ नोव्हेंबर पूर्वी अचानक बंद करण्यात आली. हे काय गौडबंगाल आहे, असेही चव्हाण यांनी म्हटले.

देशात कुणालाही नोटाबंदीबाबत कल्पना नव्हती, मग जय शाह यांना नोटाबंदीच्या आधी कंपनी बंद करण्याचे अंतर्ज्ञान कसे झाले, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. नोटाबंदीमुळे २ लाखाच्यावर बनावट कंपन्यांवर कुऱ्हाड कोसळल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.  नोटाबंदीसारखा मोठा भूकंप होणार आहे, याची माहिती अमित शाह यांच्या मुलाला ही माहिती आधीच होती का? असा प्रश्नदेखील निर्माण झाला असल्याचे चव्हाण म्हणाले.

COMMENTS