भाजपमध्ये तशी वाचाळवीरांची संख्या कमी नाही. अधूनमधून त्यांच्या पक्षातलं कोणी ना कोणी वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत असतं. पण भाजपामध्ये काही शांत, संयमी आणि जे मोजून तोलून बोलतात त्यामध्ये महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची गणना होते. मात्र परवाच्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत दादांचं वक्तव्य ऐकल्यानंतर तेही त्याच माळेतले मनी आहेत असं म्हणावं लागेल. खरतंर दादांचं ते वादग्रस्त्र वक्तव्य कुठल्याही माध्यमात आलं नाही. नाहीतर राज्यात त्याच्यावरुन वादंग उठल्याशिवाय राहलं नसतं. किंबहुना शेतकरी संतापानं पेटून उठला असता. त्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत दादा म्हणतात, “ शेतकरी बँकेतून 1 लाख रुपयांचं पिक कर्ज काढतो, लगेच महाराष्ट्र बँकेत जातो आणि 11 महिन्यांची 1 लाखाची एफडी करतो, 11 महिन्यानंतर महाराष्ट्र बँकेतून एफडी काढतो, व्याजाचे साडेसहा हजार रुपये खिशात टाकतो आणि एक लाख रुपयांचे पीककर्ज परत करतो, वेळेत पीककर्ज परत केल्यामुळे त्याला शून्य टक्याने कर्ज मिळते ” असे काही शेतकरी आहेत असं आपण म्हटला असता तरीही कुणाची काही हरकत नव्हती. असे प्रकार करणारे चार दोन टक्के शेतकरी असतीलही, पण तुम्ही पुढे म्हणालात (पत्रकारांना उद्देशून) “याची संख्या किती आहे तुम्हाला माहिती आहे का ? ” पत्रकारांनी किती ? असे म्हटल्यावर दादा म्हणाले तुम्हाला आकडा सांगत नाही पण याची संख्या खूप मोठी आहे. दादा यालाच आमचा आक्षेप आहे. दादा तुम्ही आकडा जाहीर करुन टाका. त्या सर्वांना तुरुंगात टाका. चुकीचे करत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. पण तुम्ही समस्त शेतक-याला असं आरोपीच्या पिंज-यात उभं करु नका. अहो, पीक कर्ज मिळवण्यासाठी काय त्रास सहन करावा लागतोय हे तुम्हा नक्कीच माहित नाही, बँकेत किती हेलपाटे घालावे लागताते हेही तुम्हाला माहिती नाही. खरंतर तुम्ही पुराव्याशिवाय बोलत नाहीत अशी तुमची ख्याती आहे. तुमच्याबद्दल सर्वानांच आदर आहे, पण तुमच्या त्या वक्तव्याने त्याला निश्चितपणे तडा गेलाय. परवा कोणीतरी विरोधक तुम्हाला तुम्ही पदवीधरचे आमदार आहात, त्यामुळे शेती आणि ग्राऊंडवरचं तुम्हाला काहीच माहिती नाही असं म्हटलं होते. ते आता खरं वाटायला लागलंय. दादा हे बोलणं बरं नव्हं.
COMMENTS