आता 56 इंचांची छाती दाखवण्याची वेळ आली आहे – संजय राऊत

आता 56 इंचांची छाती दाखवण्याची वेळ आली आहे – संजय राऊत

आता 56 इंचांची छाती दाखवण्याची वेळ आली असून काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा बदल घ्या, अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 7 यात्रेकरू ठार झाले आहेत. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जहाल शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, की अमरनाथ यात्रेवरील हल्ला हा देशावरील हल्ला आहे. हल्ल्याचा फक्त ट्विटरवर निषेध व्हायला नको. आता खऱ्या अर्थाने छप्पन्न इंची छाती दाखवण्याची वेळ आली आहे. आता चर्चा नको बदला घ्या. अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ला हा दिल्लीतील मजबूत सरकारवर झालेला हल्ला आहे. या हल्ल्याचा फक्त निषेध करून चालणार नाही, चोख उत्तर दिले गेले पाहिजे, असे सांगून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सर्जिकल स्ट्राईक आणि नोटाबंदीने पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर काहीच फरक पडला नाही. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा बंदोबस्त करायला हवा, असेही ते म्हणाले.

संजय राऊत यांनी यावेळी अमरनाथ यात्रेबाबत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवण सांगितली. ते म्हणाले, की 1996 साली अमरनाथ यात्रेवरही संकट होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमरनाथ यात्रेकरूंच्या केसालाही धक्का लागला तर मुंबईच नव्हे, तर देशातून हज यात्रेसाठी एकही विमान जाऊ देणार नाही असे ठणकावले होते. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत झाली होती. तशीच कडक भूमिका आता घेण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. अशी भूमिका घेणारा दुसरा नेता देशात नाही. देशातील 80 कोटी हिंदूंचा वाली कोण, असा सवालही राऊत त्यांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS