सोलापूर – बार्शी बाजार समितीतील 2015 -16 च्या अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन सभापती आमदार सोपल यांच्यासह 18 संचालकांवर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा विशेष लेखा परिक्षक व्ही व्ही डोके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
बाजार समितीमध्ये सुमारे 19 लाख रुपयांचा अपहार तर सुमारे 86 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. दरम्यान आमदार सोपल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यातूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बार्शी बंदची हाक दिली आहे. दुकाने आणि व्यवहार बंद करण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे शहरात काही प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणात अजून कोणालाही अटक झालेली नाही.
COMMENTS