‘इंदू सरकार’ प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा –  विखे पाटील

‘इंदू सरकार’ प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा – विखे पाटील

मुंबई – मधूर भंडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘इंदू सरकार’ चित्रपटात इतिहासाचा विपर्यास झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

आपल्या पत्रात विखे पाटील यांनी नमूद केले आहे की, या चित्रपटाची कथा दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी आणि काँग्रेस नेते स्व. संजय गांधी यांच्या जीवनाशी संबंधीत असल्याचे दिसून येते. परंतु, सदरहू चित्रपटामध्ये वस्तुस्थितीशी विसंगत अशा पद्धतीने काही घटनांचे सादरीकरण असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्याची शंका खरी ठरली तर प्रेक्षकांच्या भावना दुखावून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात. त्याचप्रमाणे वस्तुस्थितीशी छेडछाड करून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि स्व. संजय गांधी यांची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला तर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करू शकतात. या पार्श्वभूमिवर संभाव्य वाद टाळण्याच्या हेतूने प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट संबंधितांना दाखविण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तातडीने हस्तक्षेप करावा; जेणेकरून संभाव्य अप्रिय घटना टाळता येतील, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.

 

 

COMMENTS