उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही एमआयडीसीची 400 एकर जमीन मूळ मालकाला परत केल्याचा आरोप आहे. यामध्ये सुभाष देसाई यांनी 50 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. असा आरोप अजित पवार यांनी आज विधानसभेत केला. विधानसभेत सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
यावेळी अजित पवार म्हणाले की, ‘उद्योगमंत्र्यांनी 31 हजार 50 एकर जमीन एमआयडीसीतून बेकायदा वगळली असून. उ्दयोग मंत्र्यांनी 50 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. शेतकऱ्यांनी मागणी केली असती आणि जमीन वगळल्या असत्या तर योग्य होते. पण स्वस्तीक बिल्डर अर्ज करतो आणि जमीन वगळल्या जातात. नारयाण राणे उद्योगमंत्री असताना असा अर्ज आला होता, पण त्यांनी वगळले नव्हते. आताच्या उद्योगमंत्र्यांनी जमीन वगळण्याचा निर्णय घेतला. एकनाथ खडसे एमआयडीसी जमीनीबाबत माहिती मागतायत, पण सरकार ती माहिती वगळतेय.’ असा आरोप आज अजित पवार यांनी विधानसभेत केला.
‘प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा. खुद्द गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी चाळीत भाड्याने खोली घेतल्याची माहिती आमच्याकडे आहे. चाळीचा पुनर्विकास होणार आहे, त्याच चाळीत मंत्री, मुलगा आणि इतर नातेवाईकांनी खोल्या भाड्याने घेतलेल्या असतात. बोगस भाडेकरू दाखवून सदनिका लाटण्याचा प्रयत्न आहे. गृहनिर्माण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. मुलगा अधिकृत भाडेकरू असल्याचे मंत्री सांगतात, पण तसा कोणताही पुरावा नाही. किशोर मेहता नावाचा भाडेकरूच नाही, किशोरी मेहता नावाच्या भाडेकरू आहेत. रेकॉर्डमध्ये स्पष्टपणे खाडाखोड केली आहे.’ अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
.
COMMENTS