इराणमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले, 12 जणांचा मृत्यू

इराणमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले, 12 जणांचा मृत्यू

इराणच्या संसदेवर आज हल्ला करण्यात आला आहे.  अवघ्या तासाभराच्या अवधीत तीन दहशतवादी हल्ले झाले. इराणच्या संसदेत अज्ञातांनी गोळीबार केल्यानंतर इराणचे माजी अध्यक्ष अयातुल्ला खोमेनी यांच्या समाधीस्थळावर दुसरा हल्ला झाला. तर मेट्रो स्टेशनजवळ तिसरा हल्ला झाला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये 12 जण ठार झाले आहेत. इराणच्या सुरक्षा दलांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

इराणच्या संसदेत तीन ह्ल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात तीन जण जखमी झाले.  यामध्ये एका सुरक्षा अधिकाऱ्याचा आणि दोन सामान्य नागरिकांचा समावेश आहे,’ अशी माहिती खासदार इलियास हझरती यांनी दिल्याचे एका वृत्तसंस्थेने दिले. इराणचे माजी अध्यक्ष अयातुल्ला खोमेनी यांच्या समाधीस्थळावरदेखील गोळीबार झाला. इराणमध्ये झालेला हा दुसरा हल्ला होता. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. यासोबतच इमाम खोमेनी मेट्रो स्टेशनजवळ तिसरा हल्ला झाला. हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.  अवघ्या तासाभराच्या अवधीत तीन ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमुळे इराण हादरले.

 

COMMENTS