मुंबई – शिवसनेच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना पुढील राजकीय वाटचालीबाबत मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे प्रत्येक दसरा मेळावा हा पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असतो. आजचा दसरा मेळावा तर शिवेसनेच्या दृष्टीनं नेहमीपेक्षा जास्त महत्वाचा आहे. त्यामुळेच आजच्या दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना भाजप यांच्यातीला वाढलेला तणाव, शिवसेनेच्या नेत्यांची सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत देणारी वक्तव्य, काही आमदारांची सत्तेतून बाहेर न पडण्याची मानसिकता, नारायण राणे यांचा मंत्रीमंडळातील संभाव्य प्रवेश यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी झालेली दिसते आहे. त्यावर आता कसा मार्ग काढला जातो आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
भाजप शिवसेनेमधील संबंध कधी नव्हे येवढे विकापाला गेले आहेत. विविध प्रश्नावरुन शिवेसेनाही भाजपला कोंडीत पकडत आहे. शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नाहीत. त्यामुळे आमदार अस्वस्थ आहेत. अशा स्थितीत सरकारसोबत सत्तेत राहणं पक्षाला परवडणार नाही. पक्षाचे काही नेते आणि आमदार सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी करत पक्षप्रमुखांवर दबाव आणत आहेत.
दुसरीकडे मराठवाड्यातील आणि ग्रामिण भागातील आमदार हे सरकारमधून बाहेर पडण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. शिवसेना सत्तेतून बाहेर पडली आणि निवडणुका लागल्या तर पुन्हा निवडूण येण्याची शाश्वती या आमदारांकडे नाही किंबहुना दोन वर्षापूर्वीच निवडणुकीला सामोरं जाण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे सरकारमधून बाहेर पडू नये अशी त्यांची मागणी आहे.
शिवेसनेचे कट्टर विरोधक नारायण राणे हे उद्या आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत निर्णय घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणे हे आपला स्वतःचा नवा पक्ष काढणार असल्याचं समतंय. तसंच त्यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे लगेच त्यांची राज्याच्या मंत्रीमंडळात वर्णी लागू शकते. असं झालं तर राणेंसोबत मंत्रीमंडळात काम कसं करायचं असा प्रश्न शिवसेनेपुढे आहे.
या सर्व प्रकारामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी पक्षाची अवस्था झाली आहे. त्यातून आता पक्षप्रमुख कसा मार्ग काढतायेत याकडं पहावं लागेल.
COMMENTS